अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे देशभरासह राज्यात तांडव सुरू आहे याला अहमदनगर जिल्हा व कोपरगाव विधानसभा मतदार संघ देखील अपवाद नाही.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे रूप हे अतिशय रूद्र असून कोविडचे लक्षण आढळून आल्यानंतर त्याकडे थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी बाधित रुग्णांना आपला जीव वाचविण्यासाठी ऑक्सिजन बेडची नितांत गरज भासत होती मात्र बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बेड उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना बेड मिळत नव्हते.
बाधित रुग्णांची होत असलेली अडचण ओळखून काही दिवसांपूर्वी आमदार आशुतोष काळे यांनी १०० ऑक्सिजन बेडचे डेडिकेटेड कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेऊन व युद्धपातळीवर काम पूर्ण करून बाधित रुग्णांना येत असलेला ऑक्सिजन बेडचा प्रश्न निकाली काढला आहे.
या कोविड सेंटरला कर्मवीर शंकरराव काळे कोविड सेंटर असे नाव देण्यात आले असून आज (दि.३)पासून हे कोविड सेंटर कार्यान्वित झाले असून आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते अतिशय साध्या पद्धतीने लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे.
कोरोनाच्या आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे मागील एक महिन्यापासून दिवसागणिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून बहुतांश बाधित रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजन बेडचीआवश्यकता भासत होती.
मात्र यापूर्वी कधीही अशा प्रकारची विदारक परिस्थिती निर्माण झाली नसल्यामुळे सर्वत्रच ऑक्सिजन बेडची संख्या नगण्य होती. त्यामुळे शेकडो कोरोना बाधित रुग्णांचे ऑक्सिजन बेड मिळत नसल्यामुळे हाल होत होते.
अनेक रुग्ण ऑक्सिजन बेड मिळावा यासाठी प्रतीक्षेत होते तर खाजगी कोविड केअर सेंटरला देखील मर्यादित ऑक्सिजन बेड असल्यामुळे व सर्वत्रच ऑक्सिजनची टंचाई जाणवत असल्यामुळे बाधित रुग्णांना उपचार मिळण्यात अडचणी येत होत्या.
यावर आमदार आशुतोष काळे यांनी १०० ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरू करून ऑक्सिजन बेडची आवश्यकता असणाऱ्या बाधित रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. रुग्णांना वेळेत उपचार मिळणार असून त्यामुळे निश्चितपणे कोरोना संसर्गामुळे होणारा मृत्यु दर कमी होण्यास मदत होणार आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उडविलेल्या हाहाकाराणे आरोग्य साहित्याची काहीशी टंचाई जाणवत असली तरी आमदार आशुतोष काळे परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.त्यामुळे अँटिजेन टेस्ट करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या टेस्टिंग किटची टंचाई जाणवताच स्वखर्चातून पहिल्या टप्यात एक हजार व दुसऱ्या टप्यात दोन हजार अशा एकूण तीन हजार टेस्टिंग किट आरोग्य विभागाला दिल्या आहेत.
तसेच साईबाबा तपोभूमी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने बाधित रुग्णांच्या सेवेसाठी ऑक्सिजन अंबुलन्स देखील आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. मागील वर्षांपासून आलेल्या कोरोना संकटापासून त्यांनी आरोग्य विभाग व प्रशासनाला वेळोवेळी केलेली मदत मतदार संघात सुरू केलेली माझे कुटुंब,
माझी जबाबदारी ही मोहीम त्यामुळे कोरोनाचे संकट जरी गंभीर असले तरी आमदार आशुतोष काळे खंबीर असल्याचे त्यांनी केलेल्या उपाय योजनांतून दिसून येत असून येत्या काही दिवसात नक्कीच कोरोनावर नियंत्रण मिळविले जाईल यात शंका नाही.
याप्रसंगी सभापती सौ. पूर्णिमा जगधने उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे व्हाईस चेअरमन सुधाकर रोहोम कारभारी आगवन, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, महात्मा गांधी ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके,
मंदार पहाडे, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, हाजीमेहमूद सय्यद, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, डॉ. दीपक पगारे, एसएसजीएमचे प्राचार्य डॉ. शंकरराव थोपटे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते, डॉ. वैशाली बडदे आदी मान्यवर उपस्थित होते.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|