अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-कोरोनाच्या संकटकाळात कर्तव्य बजावणार्या शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांना वार्यावर न सोडता त्यांना 50 लाखाचा विमा संरक्षण देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीत पवार, शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड व शालेय शिक्षणचे अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना पाठवले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
राज्यातील शिक्षकांना दि.2 मे पासून 14 जून पर्यंत उन्हाळी सुट्टी जाहिर करण्यात आलेली आहे. मात्र काही शिक्षकांना सुट्टी अगोदरपासूनच कोरोनाच्या वेगवेगळ्या कामांसाठी नियुक्त करण्यात आलेले आहे. अनेक ठिकाणी शिक्षकांना शहर सोडून न जाण्याचे आदेशही काढण्यात आलेले आहेत.
गेल्यावर्षापासूनच ग्रामपंचायत निवडणूकच्या मतदार याद्या तयार करण्यासोबतच इतर कामांसाठी जुंपले होते. त्यांना उन्हाळी सुट्टी मिळणे अपेक्षित होती.
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी अनुदानित, अंशतः अनुदानित, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका शाळेतील शिक्षकांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत. मात्र या शिक्षकांना जीविताचे संरक्षण करणारी व्यवस्था उपलब्ध करण्यात आलेली नाही.
शिक्षक आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता दिलेली जबाबदारी पार पाडत आहे. जबाबदारी पार पाडत असताना राज्यातील सुमारे 212 शिक्षक कोरोनाने मृत्युमुखी पडले आहे.
या मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना शासन निर्णयानुसार 50 लाखाचे विमा कवचचे सानुग्रह अनुदान देण्यात आलेले नाही. तसेच त्यांच्या औषधोपचारासाठी केलेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती सुद्धा करण्यात आलेली नाही.
काही शिक्षकांचे प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आले, काही प्रस्ताव तांत्रिक बाबींमुळे नाकारण्यात आले. तर अनेक प्रस्ताव सादर करण्यात आलेले नसून ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
कोरोनाच्या काळात कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना वार्यावर न सोडता त्यांना 50 लाखाचा विमा संरक्षण द्यावे,
मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना 50 लाखाचे विमा संरक्षणचे सानुग्रह अनुदान तात्काळ देण्यात यावे, वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात यावी आणि अनुकंपा अंतर्गत नियुक्ती देण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली असल्याचे बोडखे यांनी सांगितले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|