अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य व्यवस्थेवरचा ताण वाढत असताना शिर्डीत साई संस्थानच्या रुग्णालयातील स्टाफमधील कर्मचारी आणि नर्स यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.
आपल्या विविध मागण्यांसाठी स्टाफ मधील एकूण 180 कर्मचारी आणि नर्सचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरु आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि,
साईबाबा संस्थानच्या साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व साईनाथ रुग्णालयातील कंत्राटी परिचारिका व परिचारक यांनी संस्थानच्या सेवेत कायमस्वरूपी करण्यात यावे अथवा समान काम समान वेतन द्यावे,
या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी जागतिक परिचारिका दिनी काम बंद आंदोलन सुरू केले होते. या कंत्राटी आरोग्य सेवकांचे काम बंद आंदोलन हे बेकायदेशीर असल्याचे सांगत पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
या आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते. ‘संस्थानच्या सेवेत कायमस्वरूपी करण्यात यावे अथवा समान काम समान वेतन द्यावे किंवा आरोग्य सेवेतील कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे किमान ४४ हजार ९०० रुपये वेतन द्यावे,’ अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान आज परिचारिका दिनाच्या दिवशी आंदोलन करणाऱ्या परिचारिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलकांना ताब्यात घेण्याची कारवाई करीत असताना पोलीस आणि आरोग्य कर्मचारी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक, हमरीतुमरी झाल्याचं यावेळेस पाहायला मिळाले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|