जाणून घ्या काय आहे गाय आणि म्हशीच्या दुधातील फरक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ दररोज आहारात घ्यावेत कारण त्यानं शरीराला पोषण मिळतं. दुधाबाबत एक प्रश्न मात्र नेहमी उपस्थित होतो तो म्हणजे गायीचं दूध चांगलं की म्हशीचं? गायीच्या दुधात म्हशीच्या दुधाच्या तुलनेनं फॅट्स कमी असतात. हेच कारण आहे की म्हशीचं दूध घट्ट आणि गायीचं दूध पातळ असतं.

गायीच्या दुधामध्ये म्हशीच्या दुधाच्या तुलनेनं चार टक्क्यांपर्यंत कमी फॅट्स असतात. सामान्यपणे गायीच्या दुधात ३-४ टक्के फॅट्स असतात, तर म्हशीच्या दुधात ७-८ टक्क्यांपर्यंत फॅट्स असतात. त्यामुळेच म्हशीचं दूध पचण्यासाठी जड असतं. याच्या तुलनेत गायीचं दूध पचायला हलकं असतं.

गायीच्या दुधात पाण्याचं प्रमाण असतं अधिक – ज्या नवजात बालकांना कुठल्याही कारणांनी आईचं दूध मिळत नाही, पिता येत नाही. अशा बाळांना गायीचं दूध पाजलं जातं. जर आपण डाएट कॉन्शियस असाल तर आपण गायीचं दूध प्यावं. जर आपल्याला वजन वाढवायचं आहे आणि अशक्तपणा असेल तर आपण म्हशीचं दूध प्यावं.

गायीचं दूध पातळ असतं आणि यात जवळपास ८८ टक्के पाणी असतं. हेच कारण आहे की गायीचं दूध पचायला हलकं असतं. १०० ग्रॅम गायीच्या दुधात जवळपास ८८ टक्के पाणी असतं, तर म्हशीच्या दुधामध्ये पाण्याचं प्रमाण हे ७० टक्क्यांपर्यंत असतं.

प्रोटीनची कमतरता असेल तर म्हशीचं दूध प्यावं – जर आपल्या शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर आपण म्हशीचं दूध प्यावं. गायीच्या दुधाच्या तुलनेत म्हशीच्या दुधामध्ये १० ते ११ टक्के अधिक प्रोटीन असतं. प्रोटीनमुळेच म्हशीचं दूध हे हीट रेजिस्टंट असतं आणि यामुळेच आजारी, वृद्ध आणि नवजात बाळांना म्हशीचं दूध देऊ नये, असं सांगितलं जातं.

म्हशीच्या आणि गायीच्या दुधातील आणखी एक मोठं अंतर म्हणजे कोलेस्ट्रॉल. म्हशीच्या दुधामध्ये गायीच्या दुधाच्या तुलनेनं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी असतं. म्हणून म्हशीचं दूध हाय बीपी, कोलेस्ट्रॉल, किडनीचे आजार असलेल्या व्यक्तींनी अवश्य प्यावं.

कोणत्या दुधात असतात अधिक कॅलरीज – म्हशीच्या दुधामध्ये प्रोटीन आणि फॅट्स दोन्ही जास्त असतात. तर गायीच्या दुधात हे दोन्ही कमी असतात. एक कप म्हशीच्या दुधातून आपल्याला २७३ कॅलरीज मिळतात, तर १ कप गायीच्या दुधामधून १४८ कॅलरीज मिळतात.

म्हशीचं दूध प्यायल्यानंतर आपल्याला शांत झोप येत नाही, तर गायीचं दूध झोपण्यापूर्वी प्यायल्यानं आपल्याला चांगली झोप लागते. म्हशीच्या दुधापासून बनवलेलं पनीर, खवा, दही, खीर, कुल्फी, तूप अधिक चविष्ट होतं. तर गायीच्या दुधापासून बनवलेले हे पदार्थ वजन कमी करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरतात.

पोटॅशिअम आणि सोडियम – कॅल्शिअमचं प्रमाण म्हशीच्या दुधात अधिक असते. तर गायीच्या दुधामध्ये पोटॅशिअम आणि सोडिअमचं प्रमाण कमी असतं, म्हणून लहान मुलांना आणि हाय ब्लडप्रेशन असणाऱ्यांना गायीचं दूध फायदेशीर ठरतं.

गायीचं दूध पित्तशामक असतं आणि पचनक्रिया सुधारतं. तर म्हशीचं दूध पचायला जड असतं, म्हणून त्यापासून बनवलेलं तूप हे कफ आणि पित्तकारक असतं. तर आता गायीचं दूध घेणं सुरू करा. जर आपल्याला कुठलाही त्रास नाहीये आणि आपलं वजनही कमी आहे तर मग म्हशीचं दूध पिणंही फायदेशीर ठरतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe