जनजातीयांच्या उन्नतीसाठी उर्वरित समाजाने सक्रिय योगदान दिल्यास मोठा बदल होवू शकतो : डॉ.मधुकर आचार्य

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही देशात आदिवासी जनजातीयांचे धर्मांतराचे प्रकार ख्रिश्चन मिशनरींकडून चालूच होते. ते थोपवून जनजातीयांच्या उन्नतीचा प्रयत्न करण्यासाठी 1952 मध्ये मध्यप्रदेशातील जशपूरनगर येथे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम संस्थेची स्थापना करण्यात आली.

कै.बाळासाहेब देशपांडे हे संस्थापक होते. मात्र ख्रिश्चन मिशनर्‍यांनी देशात सर्वदूर हातपाय पसरले असल्याने 1977 मध्ये प्रत्येक प्रांतात वनवासी कल्याण आश्रमाचे काम वाढविण्यात आले. महाराष्ट्रातही याच काळात संस्थेचे काम सुरु झाले.

यातूनच नाशिक जिल्ह्यातील गुही येथे वनवासी कल्याण आश्रमाने आरोग्य सेवेच्या माध्यमातून आपल्या कार्याचा शुभारंभ केला. या परिसराचा संपूर्ण कायापालट करून आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम प्रकल्पामुळे झाले आहे.

जनजातीयांच्या उन्नतीसाठी उर्वरित समाजाने सक्रिय योगदान दिल्यास मोठा बदल होवू शकतो. संपूर्ण समरस हिंदू समाज निर्मितीचे उद्दीष्ट साध्य होईल असे मत वणी (नाशिक) येथील डॉ.मधुकर आचार्य यांनी व्यक्त केले.

जनजाती (वनवासी) कल्याण आश्रम, नगर शाखा आयोजित कै.ग.म.मुळे स्मृती व्याख्यानमालेत ‘जनजाती कल्याण आश्रम,गुही प्रकल्प : आलेख जनजातीयांच्या उन्नतीचा’ विषयावर चौथे पुष्प गुंफताना डॉ.आचार्य बोलत होते.

या व्याख्यानमालेचे यंदा 11 वे वर्ष असून लॉकडाऊनमुळे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून यंदा व्याख्यानमाला होत आहे. प्रारंभी सौ.माधुरी गोहाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विशारद अशोकराव पेटकर यांनी डॉ.मधुकर आचार्य यांचा परिचय करून दिला.

अजित पंडित यांनी सादर केलेल्या ‘जनसेवा ही ईश्वर सेवा, बोध त्यातला उमजूया…’ या गीताने व्याख्यानाची सुरुवात झाली. डॉ.आचार्य म्हणाले की, महाराष्ट्रात वनवासी कल्याण आश्रमाचे काम सुरु झाल्यावर माझ्या सहकार्‍यांनी मला वनवासी कल्याण आश्रमामार्फत कनाशी (जि.नाशिक)येथे दवाखाना सुरु करण्यास पाठवले.

त्यावेळी कळवण परिसरातील काही डॉक्टर तिथे जावून आरोग्य सेवा द्यायचे. या परिसरातही मिशनरींचे धर्मांतराचे काम चालूच होते. पुढे सुरगाणा तालुक्यातही वनवासी कल्याण आश्रमाने काम सुरु करायचे ठरवले. 31 जुलै 1979 ला गुही येथे वनवासी कल्याण आश्रमाचा दवाखाना सुरु केला.

गावाच्या प्रमुखाने माझ्या निवासाची घराबाहेरील ओट्यावर सोय केली. दवाखान्याच्या माध्यमातून आरोग्य सेवा सुरु केली पण लक्षात आले की, एवढेच करून थांबता येणार नाही. दवाखान्याचे काम आटोपल्यानंतर मी व माझ्या सहकार्‍यांनी आजूबाजूच्या पाड्यांवर जावून संवाद साधायला सुरुवात केली.

या परिसरात कम्युनिस्ट विचारधारा घट्ट रूजलेली असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला विरोध होताच. पण आमचे कार्य सेवेचे असल्याने जनजातीयांमध्ये विश्वास निर्माण झाला. आरोग्याबाबतही या भागात प्रचंड अंधश्रध्दा होती. तिथे उपचारांसाठी भगताला बोलावले जायचे.

तो दारुच्या बाटल्या घेवून लिंबाच्या पाल्याने रूग्णाला झोडायचा. आम्ही आधी भगतांशी संवाद साधला. त्यांना हळहळू समजावून सांगितले. त्यांनाही दवाखान्याचे महत्त्व पटायला लागले. कुष्ठरोग, क्षयरोग, सर्पदंशाच्या रूग्णांवर उपचार केले.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून पुढे औषधोपचारासाठी मदत मिळायला लागली. कालांतराने येथे आरोग्य रक्षक योजना सुरु केली. स्थानिक पातळीवर कार्यकर्ते तयार करून जुजबी औषधोपचार करण्याचे प्रशिक्षण त्यांना दिले.

स्वच्छ पाणी, परिसर स्वच्छता याबाबत काम सुरु केले. आरोग्यासोबत आर्थिक विकासावरही या भागात काम केले. यासाठी तिथल्या वनौषधीला योग्य बाजारपेठ व बाजारभाव उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. वनात बांबू मोठ्या प्रमाणावर मिळतो.

बांबूपासून शोभिवंत वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण स्थानिकांना दिले. काही आदिवासींना कलकत्याहून विमानाने आगरतळ्याला पाठवून बांबूच्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षितांनी गुही येथे बांबू कला केंद्र सुरु केले.

या परिसरात दुध व्यवसायाचीही व्यवस्था निर्माण केली. शिक्षणाकडे लक्ष दिले. त्या परिसरात आठवीच्या पुढील वर्गासाठी हायस्कूल सुरु केले. वसतिगृह सुरु केले. कालांतराने येथे शासनाच्या मदतीने आश्रमशाळाही सुरु झाली.

आज या संपूर्ण परिसराचा सकारात्मक कायापालट झालेला आहे.जनजातीय मंडळींतही आता जागृती होत आहे. शहरी मंडळी ही आपली मदतगार आहेत, ही भावना त्यांच्यात निश्चितच निर्माण झाली आहे. शेवटी पसायदानाने व्याख्यानाची सांगता झाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News