खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली ही मागणी…

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत दिशानिर्देश जारी केलेले आहेत . अहमदनगर जिल्ह्यातील  कृषी सेवा केंद्र आस्थापनांना अत्यावश्यक सेवेमध्ये  समाविष्ट करून वेळ सकाळी सात ते अकरा या वेळेत सेवा पुरविण्यास सांगितली गेली आहे .

मात्र खरीपातील पेरणीची लगबग लक्षात घेता ही वेळ अतिशय कमी असल्याने शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी गर्दी होऊ शकते.  मान्सूनच्या पावसाची यंदा चांगली अपेक्षा असताना खताच्या तसेच बियाण्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांना अडचण निर्माण होता कामा नये .

कृषी सेवा केंद्र चालकांना विविध प्रकारच्या नोंदी कराव्या लागत असल्याने व या सर्व नोंदी ऑनलाईन असल्याने वेळ जातो.  साधारणपणे एका शेतकऱ्यास बियाणे व खते देण्यासाठी किमान दहा ते पंधरा मिनिटांचा अवधी लागतो. कृषी निविष्ठा सर्व शेतकऱ्यांना निर्धारीत वेळेस  मिळणे कठीण होते.

त्यामुळे शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी सेवा केंद्रांना राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे सायंकाळी सात वाजेपर्यंत वाढीव वेळ द्यावा, अशी मागणी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

या बाबतीत बोलताना खासदार डॉक्टर विखे पाटील म्हणाले की, कोरोनाने आधीच हैराण झालेल्या शेतकऱ्याला जर कृषी निविष्ठा वेळेत व मुबलक प्रमाणात मिळाले नाही, तर दलालाकडून नागवला जाण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने  मान्सून बाबत दिलेले उत्साहवर्धक बातमीनंतर पेरणीसाठी योग्य प्रकारचे  बियाणेव खते शेतकऱ्यांना मुबलक उपलब्ध व्हावेत व त्यासाठी काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्याची आवश्यकता आहे. वेळ वाढल्यामुळे गर्दी होणार नाही तसेच शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात  बियाणे आणि खते  मिळतील. असे देखील डॉक्टर विखे पाटील म्हणाले.