स्वतःची रोपवाटीका तयार करून तेरा लाख रोपे तयार करणारा अवलिया

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. सन 1973 पासून दरवर्षी हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो.

पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, पर्यावरणविषयक समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे. तसेच पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.

सगळ्या पर्यावरणप्रेमी आणि निसर्गप्रेमींनी एकत्र येऊन पर्यावरण रक्षण आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने काम करण्याचा हा दिवस! खरंतर असा पर्यावरण दिन वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस साजरा करणारी काही मंडळी सातत्याने विविध प्रकारे असे काम करतच असतात.

गेली अनेक वर्षे असे महत्वाचे कार्य करणार्‍या संस्था आणि व्यक्ती या नेहमीच आपल्यासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक वृक्षमित्र आबासाहेब मोरे, ज्यांनी इंदिरा गांधी विद्या निकेतन, श्रीगोंदा फॅक्टरी येथे कार्यरत असताना 1982 पासून कार्यास सुरुवात 1990 पासून विद्यार्थी शिक्षक यांच्या मध्ये पर्यावरण संरक्षण संवर्धन या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यास सुरुवात केले. त्यामध्ये लाखो विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले.

त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पर्यावरण संबंधी फार मोठी जनजागृती घडून आली. 1982 पासून त्यांनी व्याख्याने देण्यास सुरुवात केली. आत्तापर्यंत त्यांची एकतीसशे व्याख्याने झाली आहेत. एवढेच नव्हे तर स्वतःची रोपवाटीका तयार करून तेरा लाख रोपे तयार केली. ना नफा ना तोटा तत्वावर महानगरपालिका, नगरपालिका, विद्यालये, महाविद्यालये व शेतकरी यांना वितरित केली.

इतर लोकांना प्रवृत्त करून 25 लोकांनी रोपवाटिका तयार केली व त्यामध्ये 25 लाख रोपे तयार करण्याचं काम त्या लोकांनी पूर्ण केले. अशा प्रकारे आबासाहेब मोरे 1982 सालापासून पर्यावरणाच्या रक्षणासाठी काम करत आहेत.

आज वयाच्या पासष्टीमध्ये देखील त्यांचे काम त्याच जोमाने अविरत सुरू आहे. 5 जून हा आपला वाढदिवस पर्यावरण विषयक कार्याने ते साजरा करत असतात, हा देखील दैवदुर्लभ योग आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. सुरुवातीला व्यक्तिगत पातळीवर सुरू केलेल्या या कामाला नंतरच्या काळात त्यांच्या सान्निध्यात असलेल्या समविचारी मंडळींनी साथ दिली. 1997 मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा 50 वा वर्धापन दिन देखील विशेष कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेऊन साजरा करण्यात आला.

या विविध प्रकारच्या उपक्रमांमधून फार मोठ्या प्रमाणावर विद्यार्थीवर्ग निसर्गसंवर्धन कामी जोडला गेला. हांगेवाडी येथील हांगेश्‍वर विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून काम करताना आबासाहेब मोरे सरांनी गावागावातुन व्याख्याने देऊन जनजागृती करण्यास सुरुवात केली.

पर्यावरणाची होणारी हानी, बेलगाम वृक्षतोड, माणूस म्हणून आपले निसर्गाविषयीचे कर्तव्य अशा विषयांवर व्याख्याने दिली. महाराष्ट्र राज्य वनविभागाकडून तसेच सामाजिक वनीकरण विभागाकडून करण्यात आलेल्या सुमारे साडे सहाशे हेक्टरच्या परिसरातील वनीकरणाचे संवर्धन करण्यासाठी संपूर्ण परिसरात जनजागृती करून त्यांनी तो सगळा भाग वृक्षराजीने संपन्न केला.

अशाप्रकारे वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन कार्याचा जणू त्यांनी अखंड यज्ञ सुरू केला. आबासाहेब सांगतात की त्यांना हे आगळेवेगळे कार्य करण्याची प्रेरणा वृक्षमित्र मोहन धारिया आणि वृक्षमित्र डॉ. अण्णा हजारे या विभूतींकडून मिळाली. त्यांच्या संपर्कात राहून या विषयाचे गांभीर्य समजले, तसेच काम करण्यास नेमकी दिशा मिळाली.

तद्नंतर शासनाकडून आबासाहेबांची महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम नियोजन मंडळावर नेमणूक करण्यात आली. एस.एस.सी. बोर्डावर देखील त्यांनी काम केले. सन 2003 मध्ये परिसरअभ्यास आणि पर्यावरण विषयाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला. इयत्ता पहिली ते चौथीचा परिसर अभ्यास तसेच इयत्ता नववी दहावीचा पर्यावरण विषयाचा अभ्यासक्रम तयार करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता.

तेथे काम करत असताना महाराष्ट्राच्या विविध भागांतील अभ्यासू व तज्ज्ञ मंडळी आबासाहेबांच्या कार्यात सहभागी झाली आणि पर्यावरण संवर्धन हा एक उपक्रम न राहता ती एक मोठी चळवळ उभी राहिली. महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात आणखी जोमाने काम सुरू झाले. निसर्गाकडून माणूस सगळ्याच गोष्टी घेत असतो.

मात्र त्याची अति प्रमाणात हानी करणं म्हणजेच त्याला ओरबाडून घेण्याची वृत्ती पर्यावरणाचा समतोल बिघडवत असते. पर्यावरणाचा विचार केला तर ती एक अविरत परंतु शिस्तबद्ध चालणारी व्यवस्था आहे. त्यातील हवा, पाणी, उष्णता, थंडी, पशुपक्षी, प्राणी, जंगले, झाडेवेली, दगडमाती एवढेच काय तर कीटक, जिवाणू, विषाणू पासून ते हत्ती एवढे प्राणी आणि पाण्या पासून ते पर्वतापर्यंत सगळेच एकमेकांना पूरक आणि एकमेकांवर अवलंबून आहेत.

यातील फक्त माणूस हा प्राणी बुद्धिमान असल्याने तो इतर कोणत्याही घटकांचा आपल्या जीवनासाठी उपयोग करून घेताना निसर्गाचा विचार करीत नाही. आणि त्यामुळेच त्या शिस्तबद्ध व्यवस्थेची शिस्त बिघडते. परिणामी पर्यावरणाचा समतोल बिघडतो आणि वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. वृक्षमित्र आबासाहेब मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचे कार्य करत आहेत.

शाळाशाळांमधून, गावागावांमधून पर्यावरणाचे महत्व पटवून देण्यासाठी जनजागृती केली जात आहे. त्यासाठी आतापर्यंत चार पर्यावरण विषयक संमेलनांचे आयोजन करण्यात आले. पहिली दोन संमेलन राळेगणसिद्धी येथे तर तिसरे पर्यावरण संमेलन भूतान देशामध्ये घेतले. त्या ठिकाणचे राजदूत मा. सरकार यांनी एक दिवसाचा कार्यक्रम घेऊन संमेलनात सहभागी झालेल्या एक्क्याऐंशी लोकांचे स्वागत केले. चौथे संमेलन कोकणात चिपळूण येथे आयोजित केले गेले.

या संमेलनामध्ये तेथील पर्यावरण, निसर्ग यांचा अभ्यास आणि त्यावरील चर्चासत्रातून अनेक मुद्दे निदर्शनास येतात. त्याप्रमाणे पुढील काळात उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जातो. पर्यावरण विषयक काम करणार्‍या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य या मंडळाचे अध्यक्ष म्हणून मा.आबासाहेब मोरे सर स्वतः काम पहात आहेत. तसेच राष्ट्रीय वनीकरण व पारस्थितिकीय विकास बोर्ड, वन व पर्यावरण मंत्रालय भारत सरकार याचेही ते सदस्य आहेत.

महाराष्ट्र शासनाकडून तत्कालीन मुख्यमंत्री मा. नामदार सुधाकरराव नाईक यांच्या हस्ते वनश्री किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच भारत सरकारच्या वृक्षमित्र या पुरस्काराने भारताचे तत्कालीन राष्ट्रपती मा. श्री. के. आर. नारायणन यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच त्यांना राष्ट्रीय शिक्षक सन्मान 2012 मध्ये महामहिम राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

पर्यावरणाचा र्‍हास ही बाब भविष्यातील पिढ्यांना न परवडणारी आहे. हा विषयावर आपण आता तरी गंभीरपणे विचार करायलाच हवा. आजच्या घडीला अनिर्बंध वृक्षतोडीमुळे हवामानातील बदल, अनियमित पाऊस, प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे अन्नधान्याचा खालावलेला दर्जा, पाण्याच्या प्रदूषणामुळे जलचरांचे धोक्यात आलेले जीवन या आणि अशा अनेक गोष्टी जर अशाच वाढत राहिल्या तर पुढे कोणते परिणाम होतील हे सांगण्याची गरज नाही.

माणसांनी या सगळ्याचा आवर घालावा हीच काळाची गरज आहे. म्हणून संस्कारक्षम वयोगटातील मुलांच्या मनात पर्यावरण संरक्षण, निसर्ग संगोपन रुजविणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच सामाजिक पर्यावरण म्हणजे समाजाची मानसिकता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जी बदलण्याची आज खूप गरज आहे. प्रत्येकाने एक तरी झाड लावावे आणि त्याची जोपासना करावी.

हा संस्कार मुलांवर झाला पाहिजे. यासाठी वृक्षमित्र आबासाहेब मोरे गेली सुमारे चाळीस वर्षे हे काम स्वयंस्फूर्तीने करत आलेले आहेत. आज त्यांच्यासोबत लाखो पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांची फौज आहे. त्यात भर म्हणून यावर्षी फक्त महिलावर्गाचे महिला सखीमंच विविध जिल्ह्यांतून तयार करण्यात आले आहेत. खर्‍या अर्थाने हा पर्यावरणाचा वटवृक्ष आज बहरत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe