राहुरी शहर – गेली दोन वर्षे सुरळीत चाललेला डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखाना यंदा उसाच्या टंचाईमुळे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. मागील वर्षी कमी पावसाने राहुरीतील ऊसक्षेत्र घटण्यास कारणीभूत ठरले.
तनपुरेच्या कार्यक्षेत्रात १५ लाख टन ऊस असतो, मात्र यंदाच्या गळीत हंगामात राहुरी तालुक्यात केवळ २ लाख टन ऊस उपलब्ध आहे. नवीन लागवडीसाठी बेणे म्हणून त्यातील एक लाख टन ऊस वापरला जाणार आहे.
ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे मका, कडवळ, घास ही चारापिके भुईसपाट झाल्याने यावर्षी जनावरांच्या चाऱ्यासाठी उसाची मागणी वाढली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या गळीत हंगामात शेजारील साखर कारखान्यांकूुन राहुरीतील उसाची उचलेगिरी होणार आहे.
यंदा पावसाची कृपा झाल्याने पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे पुढील गळीत हंगामात राहुरीच्या कार्यक्षेत्रात १२ ते १४ टन ऊस उपलब्ध होऊ शकेल. उसाचे मळे फुलवणारा तालुका ही राहुरीची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असली, तरी डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखान्यावर ३०० कोटींच्या पुढे कर्ज झाल्याने २०१३ ते १६ या कालावधीत कारखाना बंद ठेवण्याची दुर्दैवी वेळ आली होती.
कोट्यवधींच्या कर्जामुळे हा कारखाना इतिहासजमा होण्याची शक्यता होती. जिल्हा बँकेच्या मदतीने दोन वर्षांपूर्वी कारखाना पुन्हा सुरू झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व बाजारपेठेतील व्यावसायिकांना दिलासा मिळाला. २०१७ च्या गळीत हंगामात २ लाख २० हजार, तर २०१८ च्या हंगामात ३ लाख ३६ हजार टन गाळप यशस्वीपणे पार पाडल्याने बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढण्यास हातभार लागला.
मागील दोन वर्षांच्या हंगामात कारखाना व्यवस्थापनाने जिल्हा बँकेच्या कर्जापोटी १७ कोटींच्या दरम्यान, तर २०१२ मधील एफआरपी रकमेपोटी ११ कोटी ऊस उत्पादक शेतक-यांना अदा केले आहेत. मागील गाळपासाठी आलेल्या उसाचे २३०० रूपये टनाप्रमाणे पेमेंट शेतकऱ्यांच्या खाती वर्ग करण्यात आला.
एफआरपीप्रमाणे ११६ रूपये टनप्रमाणे शेतकऱ्यांना देणे बाकी आहे. यंदा उसाच्या टंचाईमुळे तनपुरे साखर कारखान्याचा गळीत हंगाम बंद राहणार असला, तरी कारखान्याची मशिनरी सुसज्ज असल्याने पुढील हंगामात कारखाना मोठ्या प्रमाणात गाळप करू शकेल.