अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत निवडणूक लढवणार असं म्हणाले आहेत.
जरी शरद पवार असं म्हणाले असले, तरी शरद पवार साहेब कधीही शिवसेनेसोबत निवडणूक लढवणार नाहीत”, असं भाकित माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी ट्वीट करून वर्तवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेसोबत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्यासंदर्भात सूचक विधान केलं होतं.
यावेळी बोलताना शरद पवारांनी महाविकासआघाडीचं कौतुक देखील केलं होतं. त्या विधानाचा धागा पकडत राणेंनी हे टि्वट केले आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या दिवशी बोलताना महाविकासआघाडीचं भवितव्य आणि लोकसभा-विधानसभेविषयी वक्तव्य केलं होतं.
“हे सरकार टिकेल आणि पाच वर्ष काम करेल. नुसतंच काम करणार नाही तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित काम करुन सामान्य जनतेचं देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचं काम करेल याबाबत शंका नाही”, असं पवार म्हणाले होते.
त्यावरून भाजपाकडून खोचक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राणेंनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात, तेव्हा त्याचा उलटअर्थी अर्थ लावायचा असतो. ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे.
दरम्यान, याआधी शरद पवार यांनी शिवसेनेबाबत घेतलेल्या भूमिकेवरून भाजपा आमदार राम कदम यांनी देखील टीका केली होती. “शरद पवार यांना शिवसेना हा वचन पळणारा मित्र आहे, असे म्हणावे लागले ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची राजकीय हतबलता आहे.
जो पक्ष बाळासाहेब ठाकरे यांचे वचन पाळू शकला नाही तो वचन पाळणारा पक्ष कोणत्या आधारावर आहे”, असं राम कदम म्हणाले आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम