अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. यातच आता काहीशी दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत आली असल्याने अनलॉक करण्यात आला आहे.
मात्र संभाव्य कोरोनाचा धोका पाहता पारनेरमध्ये प्रशासनाने बुधवार व शनिवार दोन दिवस जनता कर्फ्युऐवजी फक्त शनिवारी पारनेर तालुका व बुधवारी सुपा येथील सर्व व्यवहार बंद राहील अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार केला होता. तालुक्यातही रुग्ण संख्या झपाट्याने वाढली मात्र आता रुग्ण संख्या कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे तालुक्यात बुधवार व शनिवार दोन दिवस जनता कर्फ्युचा निर्णय करोना रुग्ण संख्या नियंत्रणात आल्यामुळे रद्द करण्यात आला आहे.
तहसीलदार ज्योती देवरे तसेच व्यावसायिक व व्यापारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर तालुक्यात फक्त आठवड्यातून शनिवारी सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयाला सर्वव्यापारी व्यवसायिकांनी पाठिंबा दर्शवला असल्याने शनिवारी जनता कर्फ्यु असणार आहे.
तसेच बुधवारी सुपा येथे आठवडा बाजार भरला असून गर्दी होत आहे. त्या अनुषंगाने बुधवारी सुपा पूर्ण बंद राहील असे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले आहे.
दरम्यान भविष्यात तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने नागरिकांनी काळजी व खबरदारी घ्यावी निर्बंध खुले केले असले तरी कोरोना संदर्भातील नियमावलीचे पालन होणे गरजेचे आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम