डॉ. तनपुरे कारखाना सुरू करण्यास जिल्हा बँकेची परवानगी !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू करण्यास जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने परवानगी दिली असल्याची माहिती ज्येष्ठ संचालक माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दिली. जिल्हा सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाची मासिक बैठक काल अहमदनगर येथे झाली.

तीत हा निर्णय घेण्यात आला. राहुरी येथील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना यावर्षी पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हा बँकेची परवानगी मिळावी, यासाठी कारखाना संचालक मंडळाने माजी आमदार कर्डिले यांची भेट घेतली होती.

यावेळी कारखाना सुरू करण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाचे नेहमीच सहकार्य झाले आहे आणि भविष्यातदेखील राहील, असे आश्वासन कर्डिले यांनी दिले होते. डॉ. तनपुरे कारखाना सुरू राहावा, शेतकरी, सभासद व कामगार यांच्यासाठी आपण वेळोवेळी सहकार्य केलेले आहे. त्यामुळे बॅँकेच्या मासिक बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

जिल्हा बँकेची गाळप हंगामास परवानगी मिळाल्याने कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक बाबी पूर्ण करता येणार आहेत. मागील वर्षी तांत्रिक अडचणींमुळे कारखाना कमी दिवस चालला.

त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे ऊस तोड न मिळाल्याने हाल झाले. ते यावर्षी होऊ नये, अशी अपेक्षा ऊसउत्पादक व्यक्त करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe