अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ : भाजपाकडून राम शिंदे यांना …

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- काही दिवसांपूर्वी माजी मंत्री राम शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त भेटीची चर्चा सुरू झाली होती. त्याचे शिंदे यांनी खंडणही केले होते.

या पार्श्वभूमीवर आता भाजपचेच गोपीचंद पडळकर यांच्या शिंदेच्या मतदारसंघातील दौऱ्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जाऊ लागले आहे.

पडळकर यांची ही मोर्चेबांधणी ओबीसी आणि भाजपसाठी असल्याचे सांगण्यात येत असले तरी याच मतदारसंघातील माजी आमदार आणि ओबीसी नेते प्रा. राम शिंदे यांना धक्का पोहचविणारी मानली जात आहे.

कर्जत – जामखेड या राम शिंदेंच्या व ओबीसींची लोकसंख्या जास्त असलेल्या या मतदारसंघात पडळकरांनी लक्ष घातल्याचे दिसत असल्याने त्याचे राजकीय अर्थही काढले जाऊ लागले आहेत. ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील नेते रान पेटवत आहेत.

त्यात पडळकर यांचाही समावेश आहे. मात्र, पडळकर हे पवारांचे कट्टर विरोधक आणि कडक शब्दांत टीका करणारे म्हणून ओळखले जातात. भाजपचे गोपीचंद पडळकर सध्या राज्यभर फिरत आहेत. ओबीसी विशेषत: धनगर समाजाची संख्या जास्त असलेल्या भागात त्यांचा भर आहे.

त्याच उद्देशाने ते कर्जत-जामखेडमध्ये आले होते. असे असले तरी याकडे आता वेगळ्या दृष्टीने पाहण्यात येऊ लागले आहे. या मतदारासंघाचे माजी आमदार, माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राम शिंदे हेही ओबीसींचे नेते आहेत. तीन वेळा ते या मतदारसंघाचे आमदार होते.

पवार यांनीच गेल्या वेळी त्यांचा पराभव केला. तेव्हापासून त्यांचे पुनर्वसन झालेले नाही. मात्र आता आमदार गोपीचंद पडळकर यांनीच थेट कर्जत जामखेड मतदार संघात थेट एंट्री केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ असून भाजपाकडून राम शिंदे यांना डावलत पडळकर यांचे महत्व वाढविले कि काय अशी शंका उपस्थित होते आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe