अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- राज्यातील विस्थापित मराठ्यांना आरक्षण मिळू नये, अशी प्रस्थापित मराठा नेत्यांची इच्छा आहे, अनेक वर्षे मराठा नेत्यांकडे मुख्यमंत्रीपद असतानाही मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही.
बिगर मराठा नेते देवेंद्र फडणवीस हेच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात, असे प्रतिपादन रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केले. संगमनेर तालुक्यातील साकूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात खोत बोलत होते.
याप्रसंगी बुवाजी खेमनर, कोंडाजी कडणार, बाबासाहेब सोडणार आदी उपस्थित होते. खोत म्हणाले, दूध उत्पादकांना योग्य भाव मिळाला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी पहिला लढा उभा केला. आरक्षण मिळावे यासाठी मागील सरकारच्या काळात समाजाने मोठे मोर्चे काढले. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण मंजूर केले,
हे आरक्षण उच्च न्यायालयातही टिकले, मात्र विद्यमान आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य भूमिका न मांडल्याने मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले. विस्थापितांना आरक्षण मिळू नये, अशी प्रस्तापित मराठ्यांचीच इच्छा आहे.
विस्थापित मराठा आरक्षणातून मोठा अधिकारी झाला व त्याने चांगले काम केले तर तो भविष्यात आमदार येऊ शकतो, ही भीती प्रस्थापित मराठा नेत्यांना वाटते. त्यामुळे त्यांनी यापूर्वी आरक्षण दिले नाही.
दूधप्रश्नावर चर्चा करण्यासाठी २५ तारखेला बैठक बोलावली आहे, या बैठकीत काय निर्णय होतो ते पाहू, दूध मातीमोल किमतीने विकले जात असेल तर आपण मंत्र्यांना झोपू देणार नाही. सध्याचे राज्यकर्ते हे लुटारूंच्या टोळ्या आहेत.
या सरकारने राज्यातील मराठा समाज, ओबीसी समाज, बारा बलुतेदार व शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. केवळ स्वत:चे घर भरण्याचे काम सरकारमधील नेते मंडळी करत आहेत, अशी टीका खोत यांनी यावेळी केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम