अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- कोरोना आजारामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी त्यांच्या नावे पाच लाख रुपयांची मुदत ठेव सरकार ठेवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी दिली आहे.
त्यामुळे पारनेर नगर मतदारसंघातील अनाथ झालेल्या बालकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार लंके यांनी केले आहे.
कोविड संसर्गामुळे आई वडिलांच्या मृत्यूने अनाथ झालेल्या बालकांचे पालकत्व स्वीकारण्यास शासन खंबीर असून अनाथ बालकांच्या नावे पाच लाख रुपयांची ठेव ठेवली जाणार आहे.
कोविड-19 मुळे ज्या बालकांच्या आई आणि वडील अशा दोन्ही पालकांचा मृत्यू झालेला आहे अशा अनाथ बालकांना सरकारचा दिलासा आहे.
अधिवेशन काळात राज्य शासनाने प्रतिबालक पाच लाख रुपये त्यांच्या नावे मुदत ठेव ठेवण्यास मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे.
या योजनेत 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालके ज्यांचे दोन्ही पालक कोरोनाने 1 मार्च 2020 किंवा त्यानंतर कोविड 19 च्या संसर्गामुळे मयत झाले आहेत, अशा बालकांसाठी ही योजना असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले आहे.
कोविड संसर्गामुळे एका पालकांचा आणि इतर कारणामुळे दुसर्या पालकांचा मृत्यू झाला आहे, अशा बालकांसाठी ही योजना आहे. 1 मार्च 2020 पूर्वी कोणत्याही कारणाने पालकांचा आणि कोविड संसर्गाने एका पालकांचा मृत्य झाला आहे, अशा बालकांना लाभ मिळणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आमदार नीलेश लंके यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम