खत खरेदीसाठी शेतकरी भल्या पहाटपासून दुकानासमोर रांगेत

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- राहुरी तालुक्यात आद्रा नक्षत्र सुरू झाले आहे. काही ठिकाणी झालेल्या तुरळक पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली.

मात्र आता उगवण झालेल्या पिकांना खतांची गरज भासू लागली आहे. खत मिळावे, यासाठी अनेक शेतकरी रोज उपाशी पोटी चक्करा टाकत आहेत. त्यातच कोरोनाचीही भीती आहे. पण, टंचाई असल्याने अनेकांना खताविना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

सध्या शेतकऱ्यांसमोर खत टंचाईचे संकट आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळातही शेतकरी घराबाहेर पडून खत खरेदीसाठी जात आहेत. पण, कृषी केंद्रात गर्दी होत असल्याने सुरक्षित अंतराचा नियम पाळला जात नसल्याचे चित्र आहे.

खतासाठी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी खतांच्या दुकानासमोर भल्या पहाटे येऊन लांबलचक रांगा लावल्या आहेत. त्यात महिला शेतकऱ्यांनाही रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे.

मात्र एवढा आटापिटा करूनही राहुरी तालुक्यात खतांची टंचाई असल्याने शेतकऱ्यांच्या पदरात नाराजीच पडत आहे. राहुरी व देवळाली प्रवरा येथे शेतकऱ्यांना खतांसाठी तारेवरची कसरत करावी लागते.

खतांचा मर्यादित साठा, कृत्रिम टंचाई आणि काळ्या बाजारामुळे खते दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे.

पावसाअभावी पिकांना जीवदान देण्याचे कसब साधताना खतांच्या टंचाईला तोंड देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून करोना महामारीत गर्दी करताना शेतकऱ्यांच्या जिवावर बेतणार आहे.

याबाबत कृषी व महसूल प्रशासन मात्र हाताची घडी अन् तोंडावर बोट ठेवत असल्याने शेतकऱ्यांचा तिळपापड झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe