अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका अठ्ठावीस वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना राहाता तालुक्यात घडली आहे.
ज्योती मोहित साळुंके (वय २८) असे विवाहितेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, ज्योती हिचा विवाह चार वर्षांपूर्वी मोहित साळुंकेबरोबर झाला होता. लग्नानंतर संसार सुखाने सुरू होता.
काही दिवसांपूर्वी इतर तीन आरोपींनी ज्योती हिला माहेरून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली होती. माहेरची आर्थिक परिस्थिती पैसे देण्यासारखी नसल्यामुळे तिने पैसे आणले नाहीत.
त्यामुळे तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. त्यातून ज्योती हिने जीवन संपविले. माहेरच्या लोकांनी तिचा मृतदेह पाहून घातपात केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. पोलिसांना घटनेची खबर मिळाली.
ज्योती हिच्या नातेवाइकांनी सासरच्या घरासमोरच अंत्यविधी करण्याचा पवित्रा घेतला. दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी मध्यस्थी करीत आरोपींना तत्काळ अटक केली. शवविच्छेदनानंतर ज्योतीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रकरणी साळुंके हिचे नातेवाईक नानासाहेब अनर्थे (रा. चंद्रपूर, ता. राहता) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरून आरोपी पती मोहित लक्ष्मण साळुंके, सासरा लक्ष्मण साळुंके व सासू मीना लक्ष्मण साळुंके यांना पोलिसांनी अटक केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम