कामगाराचा पगार थकविणे मालकाला पडला भारी; दूध डेअरीच दिली पेटवून

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- कर्जत तालुक्यातील गणेशवाडी हद्दीतील सॉलिसिटर या डेअरी प्लांटच्या बंगल्यातील ऑफिस, स्टोअररूम व जनरेटर खोलीमधील साहित्य अज्ञात व्यक्तीने पेटवून तब्बल सात लाख रुपये किमतीचे साहित्य जाळून नुकसान केले असून यापूर्वीही दुचाकी आणि किरकोळ साहित्य संबंधित आरोपीने जाळले असल्याबाबतची तक्रार सुपरवायझर नितीन नवनाथ वाघमारे (रा.पिंपरी चिंचवड सध्या गणेशवाडी ता. कर्जत) यांनी कर्जत पोलीस ठाण्यात दिली होती.

या प्रकारचा उलगडा झाला आहे. हे कारस्थान थकीत पगारावरून झाले असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी राहुल सत्यवान मोरे (रा. खेड ता. कर्जत, जि. अहमदनगर) याला अटक केली आहे.

याप्रकरणी फिर्यादी डेअरचे सुपरवायजर नितीन नवनाथ वाघमारे (रा. पिंपरी चिंचवड, पुणे, हल्ली रा. गणेशवाडी) यांनी फिर्याद मध्ये म्हटले आहे की, १४ जून रोजी रात्री कोणी तरी सॉलिसिटर डेअरी या प्लॅन्टच्या बंगल्यातील ऑफिस,

स्टोअर रूम व जनरेटर रुममधील साहित्यास आग लावली. त्यामुळे सुमारे सात लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. यापूर्वीही एकदा दुचाकी आणि एकदा किरकोळ साहित्य जाळण्यात आले होते.

यासंबंधीही पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत बारकाईने पाहणी केली.घटनास्थळाची पाहणी केली असता जेथे आग लागली, तेथे नवख्या व्यक्तीला येणे शक्य नसल्याचे आढळून आले.

त्यामुळे कोणी तरी माहितगार व्यक्तीनेच हा गुन्हा केल्याचा पोलिसांना संशय आला. त्यादृष्टीने पोलिसांनी चौकशी सुरू केली. कामगारांकडेही चौकशी करण्यात आली. तेथे १४ कामगार आहेत.

त्यातील राहुल सत्यवान मोरे याला काही काळापूर्वी कामावरून काढून टाकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याशिवाय घटना घडली त्या रात्री मोरे त्या परिसरात दिसल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली.

त्यामुळे पोलिसांनी मोरे याच्यावर लक्ष केंद्रित केले. त्याला घरी जाऊन ताब्यात घेण्यात आले. पोलिस ठाण्यात आणून त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. त्यावर त्याने गुन्ह्याची माहिती दिली.

त्याने सांगितले की, ‘आपण या डेअरीत कामाला होतो. नंतर काढून टाकण्यात आले. कामाचे पैसेही देण्यात आले नाहीत. या रागातून आग लावली.’ पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe