अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- संगमनेर तालुका कृषी अधिकाऱ्यांविरोधात कृषिमंत्र्यांसह वरिष्ठ स्तरावर तक्रार करूनही कारवाई शून्य आहे.
दरम्यान संबंधित अधिकाऱ्याकडून तालुक्यातील कृषी केंद्रचालकांची आर्थिक व मानसिक पिळवणूक गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. मात्र प्रशासनासह मंत्र्यांकडून देखील कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

संगमनेर तालुक्यात गेल्या दोन वर्षांपूर्वी तालुका कृषी अधिकारी म्हणून नियुक्त झालेले अधिकारी प्रशांत शेंडे दप्तरतपासणीच्या नावाखाली आवक-जावक नोंदवह्या, खते व औषधांचे नमुने, पीजीआर विक्री यांबाबत प्रश्नांचा भडिमार करून पैशांची मागणी करतात,
असा गंभीर आरोप कृषी विक्रेता असोसिएशनने तक्रारीत केला आहे. नवीन परवाना, परवाना नूतनीकरण, दुकानाचे छायाचित्र काढणे, केंद्राच्या साठा नोंदवहीवर विभागाचे शिक्के मारणे, अशा विविध कामांसाठी त्यांनी पैशांच्या मागणीचे दरपत्रक निश्चित केले आहे.
दरम्यान अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर मंत्र्यांची मेहरबानी असल्याचे दिसून येत आहे. या होणाऱ्या गैरप्रकाराबाबत तालुक्यातील सर्वच कृषी सेवा केंद्रचालकांच्या संघटनेने तीन महिन्यांपूर्वी कृषिमंत्री दादा भुसे,
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या परंतु कारवाई झाली नाही. याबाबत चौकशी करून कारवाई व्हावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम