अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- सध्या ग्रामीण भागात पेरणी व मशागतीची कामे वेगात सुरू आहेत. मात्र या दरम्यान समाईक शेती,विहीर व बांधावरून मोठ्या प्रमाणात वादाच्या घटना देखील घडत आहेत.
यात अनेकवेळा वाद विकोपाला जावून त्याचे पर्यावसन मारामारीत देखील होत आहे. असेच बांध कोरण्यास मज्जाव केल्याच्या रागातून महिलेच्या पायावरून चक्क ट्रॅक्टर घालण्याची घटना कोपरगाव तालुक्यात घडली आहे.
मिराबाई बाळासाहेब थोरात असे यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत सविस्तर असे की, कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील मिराबाई बाळासाहेब थोरात
यांच्या शेतातील शेतीच्या बांधाच्या खुणा काढल्या व शेतीचा बांध ट्रॅक्टरच्या साह्याने कोरत असल्याने त्यांनी असे कृत करण्यास विरोध केला.
त्यामुळे बाबासाहेब संपत गुंजाळ, अनिता बाबासाहेब गुंजाळ, आई हिराबाई संपत गुंजाळ (सर्व रा.रांजणगाव देशमुख) यांनी फिर्यादी मिराबाईच्या पायावरून ट्रॅक्टर घातला व पायाला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिराबाई थोरात यांनी शिर्डी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार शिर्डी पोलिसांनी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून इतर पसार आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम