उरलेले पैसे मागितल्याने वृद्ध आजोबांना आरोग्य कर्मचाऱ्याकडून मारहाण

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- कोरोनाकाळात रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर, नर्स , वार्डबॉय तसेच इतर कर्मचारी हे अहोरात्र काम करत असल्याने सर्वसामान्य व्यक्ती त्यांना देवमाणूस समजू लागला.

मात्र अशातच देवळाली प्रवरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका कर्मचाऱ्याच्या वागणुकीने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवेला काळिमा फासण्याचा प्रकार केला आहे.

केसपेपर काढल्यानंतर दहा रुपयातून पाच रुपये परत मागणार्‍या वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकाला देवळाली प्रवरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍याने शिवीगाळ करून धक्काबुक्की करून त्याला ढकलून दिल्याने ते ज्येष्ठ नागरिक जमिनीवर पडले.

हा प्रकार देवळाली प्रवरा शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील कराळे यांच्यासह तेथे उपस्थित असलेल्या आरोग्य अधिकारी डॉ. नलिनी विखे यांच्यासमक्ष घडला. याबाबत कराळे यांनी तेथेच त्या कर्मचार्‍याची चांगलीच कानउघाडणी केली.

मात्र, डॉ. विखे यांनी हाताची घडी अन् तोंडावर बोट ठेवून त्या उर्मट कर्मचार्‍याची पाठराखण केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या उर्मट कर्मचार्‍यासह आरोग्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वृंदाची बदली करण्याची मागणी कराळे यांनी केली आहे.

उर्मट कर्मचारी येथील आरोग्य केंद्रात येणार्‍या रुग्णांवर दादागिरी करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून त्यांच्या बदल्या करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हे प्राथमिक आरोग्य केंद्र उपचाराचे ठिकाण की, दादागिरीचा अड्डा? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. उर्मट कर्मचारी व त्यांना पाठीशी घालणार्‍या वैद्यकीय अधिकारी यांची तातडीने बदली करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!