अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- नगर-जामखेड रोडवर बंद असलेल्या टोलनाक्यावर चक्क गावठी पिस्तूल विक्रीचा धंदा चालत होता. ग्राहकांना येथे येण्यास सांगून तेथेच सौदा करून हत्याराची विक्रीही केली जात होती. नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना याची माहिती मिळाली.
त्यांनी छापा घालून दोघांना मुद्देमालासह अटक केली आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना ही माहिती मिळाली.
नगर-जामखेड रोडवरील टाकळी काझी शिवारातील टोल नाक्याजवळ दोन तरुण गावठी कट्ट्याची विक्री करण्यासाठी थांबले असल्याची माहिती कटके यांना मिळाली. कटके यांनी माहितीची खातरजमा केली.
त्यानंतर तातडीने पोलिस पथक पाठविण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या नेतृत्वाखालील पथक तातडीने टोलनाक्यावर साध्या वेशात आणि खासगी वाहनातून गेले. पोलिसांनी तेथे सापळा रचला.
टोलनाक्याच्या बाजूलाच बंद असलेल्या एका इमारतीमागे दोघे जण संशयास्पदरित्या थांबल्याचे आढळून आले. ते दोघे तेऊन टेहळणी करीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांना पाहून ते विचलित झाले.
मात्र, तोपर्यंत पोलिसांना त्यांना घेराव घालून पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता संदीप पोपट गायकवाड, (वय ४० रा. जाबूत, ता. शिरुर, जि. पुणे) व भारत भगवान हतागळे (वय २५ रा. गोविंदवाडी, तलवाडा, ता. गेवराई, जि. बीड) अशी त्यांची नावे असल्याचे समजले.
पोलिसांनी त्यांची झडती घेतली. त्यांच्याकडे दोन गावठी बनावटीचे कट्टे, दोन जिवंत काडतूसे व दोन मोबाईल असा सुमारे ८० हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी तो जप्त केला असून दोघाही आरोपींना अटक केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम