अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळचे नातेवाईकांच्या साताऱ्यातील कारखान्यावर ईडीने धाड टाकून जप्तीची कारवाई केल्याचे प्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
आता यातच नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील साखर कारखान्याकडे लक्ष लागलं आहे. या कारखान्याच्या संबंधीही ईडीने चौकशी करावी या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली
असल्याने जरंडेश्वरनंतर येथे कारवाई होण्याची अपेक्षा असल्याचे याचिकाकर्ते बबनराव कवाद आणि रामदास घावटे यांनी सांगितले. अलीकडेच साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई झाली.
ज्या मूळ तक्रारीवरून ही कारवाई होत आहे, त्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या तक्रारीत पारनेर कारखान्याच्या व्यवहाराचाही समावेश आहे. याशिवाय बचाव समितीमार्फतही स्वतंत्र पाठपुरावा सुरू आहे.
कारखाना खरेदीसाठी काळ पैशाचा वापर… :- यासंबंधी घावटे यांनी सांगितले की, पारनेर कारखाना विकणारी राज्य सहकारी बँक व तो विकत घेणारी खाजगी कंपनी क्रांती शुगर यांच्या व्यवहारात काळा पैसा वापरला असल्याचा संशय आहे.
या खासगी कंपनीचे लेखा परीक्षण अहवालात दाखवलेले भांडवल आणि मालमत्ता पाहता हा कारखाना विकत घेण्यासाठी वापरलेल्या रकमेवर संशय निर्माण होतो. तसेच बँकेने हा कारखाना एकाच विक्री निविदेला कसा विकला? हाही प्रश्न आहे.
दरम्यान याप्रकरणी या सर्व बाबींचे पुरावे पारनेर बचाव समितीने मिळवून चौकशी करण्याची मागणी करणारी फौजदारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान जरंडेश्वर कारखान्यानंतर आता पारनेरमधील कारखान्यांवर कारवाई होणार का ? याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम