बंदी असतानाही भरविली बैलगाडी शर्यत; आता होणार गुन्हे दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :- कोरोना नियमाचा फज्जा उडवत पारनेर तालुक्यातील शिरपूर येथे मोठ्या प्रमाणात बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले.याबाबतची माहिती मिळताच पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे या घटनास्थळी दाखल झाल्या व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता पारनेर तालुक्यातील२२ गावांत कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. अशा परिस्थितीत शिरापूर गावात बैलगाडा शर्यती सुरू असल्याची माहिती तहसीलदार देवरे यांना मिळाली.

त्या ताबडतोब पथक घेऊन गावात आल्या. मात्र त्या गावात पोहोचेपर्यंत शर्यती संपवून सर्वजण पळून गेले होते. तसेच गावातही कोणी भेटले नाही. मात्र, यासंबंधी मिळालेला व्हिडिओ आणि ग्रामपंचायतीत आढळून आलेल्या रजिस्टरच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तहसीलदार देवरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक विनायकुमार बोत्रे यांच्या पथकाने ही करवाई केली. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली आहे शर्यतीला बंदी असताना व सध्या कडक कोरोना निर्बंध असताना सर्व नियम धाब्यावर बसवून शिरापूर येथे बैलगाडी शर्यत भरवण्यात आली.

ग्रामसुरक्षा समितीच्या झालेल्या दुर्लक्षामुळे सदरची बाब घडली किंवा कसे याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत. पारनेर पोलीस स्टेशन मध्ये संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe