अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील तीन जणांच्या सराईत गुन्हेगारी टोळीला जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी 15 महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश पारीत केला आहे.
या टोळीविरोधात गंभीर दुखापत करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, रस्तालुट आदी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल होते. दरम्यान हद्दपार करण्यात आलेल्या टोळीमध्ये टोळीप्रमुख सागर विठोबा कर्डिले (वय 34), सचिन ऊर्फ लखन मंजाबापु वारूळे (वय 28), गणेश गोरख साठे (वय 29 सर्व रा. वारूळवाडी ता. नगर) अशी या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, भिंगार पोलीस ठाणे हद्दीसह नगर शहरात संघटीपणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणार्या कर्डिले टोळीतील चार जणांविरोधात दोन वर्षांकरीता हद्दपारीची कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव भिंगार कॅम्प पोलिसांनी नोव्हेंबर 2020 मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांच्याकडे पाठविला होता.
या टोळीची दहशत कमी करण्यासाठी टोळी प्रमुख कर्डिले व त्याच्या दोन साथीदारांना 15 महिन्याकरीता जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. संघटीतपणे गुन्हे करणार्या टोळीविरोधात माहिती संकलीत करून हद्दपार सारखी प्रतिबंधक कारवाई करणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम