अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- नगर-सोलापूर महामार्गावर बनपिंपरी ते घोगरगाव दरम्यान ट्रक चालकाला लुटण्यासाठी लुटारूंची टोळी तयार होती. परंतु, वकील, पोलीस, चालक यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे रस्ता लुटीचा प्रसंग टळला.
दरम्यान हा प्रकार कर्जत तालुक्यातील रस्त्यावर घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, रात्री अकराच्या सुमारास पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग भांडवलकर, ॲड. शुभम दीपक भंडारी, चालक सुशील देवगिरी आणि त्यांच्या सोबत असणारे तिघे जण हे सर्व न्यायालयाच्या कामानिमित्त नगर आणि नंतर श्रीरामपूरला गेले होते.
सर्व काम आटोपून नगरवरून कर्जतकडे निघाले. कर्जतच्या दिशेने येत असताना बनपिंपरी-घोगरगावच्या मध्ये नगरच्या दिशेने थांबलेला ट्रक (केए ५६ बीझेड २३७५) आणि ट्रकच्या पुढे नंबर नसलेली दुचाकी थांबलेली दिसली.
त्यावेळी पांडुरंग भांडवलकर यांनी आपले वाहन थांबवून संबंधित ट्रकचे निरीक्षण केले. त्यांना ट्रकमध्ये क्लिनर आणि चालकाच्या बाजूने दोघे जण असल्याचे दिसले. पोलीस कर्मचारी भांडवलकर वाहनातून उतरून दुचाकीकडे गेले.
ट्रकमधून एक जण उतरला. त्याच्या हातात धारदार शस्त्र दिसताच ॲड. शुभम भंडारीही वाहनातून उतरले व चालकाला वाहन वळवा असे सांगितले. ते पाहता लुटारू दुचाकीवर बसला.
त्यानंतर तिसरा लुटारूही पळत येऊन दुचाकीवर बसताच ते वेगाने नगरच्या दिशेने निघून गेले. नंतर त्यांनी ट्रक चालकाला धीर देत जवळ असणाऱ्या हॉटेलमध्ये थांबण्यास सांगितले. त्यामुळे लुटीचा प्रसंग टळला. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कर्जतकरांच्या प्रसंगावधानाचे कौतुक केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम