अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- जिल्ह्यातील बॅंकांना खरीप हंगामासाठी दिलेले पीक कर्ज उद्दिष्ट सर्व बॅंकांनी पूर्ण करावे. सध्याच्या परिस्थितीत शेतकर्यांना शेतीकामासाठी पीककर्जाची आवश्यकता लक्षात घेऊन कर्ज वाटपास प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पीककर्ज वाटपाचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी घेतला. जिल्हा उपनिबंधक (सहकार) दिग्विजय आहेर, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक प्रकाश शेंडे यांच्यासह विविध बॅंकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले की, कोरोनामुळे संपूर्ण अर्थचक्रावर परिणाम झाला आहे.
त्याचा फटका विविध उद्योग आणि व्यवसायांना बसला आहे. मागील कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळीही शेतीक्षेत्राने अर्थचक्र सुरळित ठेवण्यासाठीचे प्रयत्न केले होते. यावेळीही तशीच काहीशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेती क्षेत्रासाठी आवश्यक पतपुरवठा बॅंकांनी करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यासाठी खरीप हंगामासाठी ३ हजार ७५३ कोटी रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य देण्यात आले होते. आतापर्यंत केवळ ५२ टक्के एवढीच कर्ज वितरणाची टक्केवारी आहे. त्यातही अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचा वाटा मोठा आहे. उर्वरित राष्ट्रीयकृत बॅंकाची पीक कर्ज वाटपाची सरासरी अत्यल्प आहे.
अशा सर्व बॅंकांनी अधिक गतिमानतेने आता पीककर्ज वितरणाची प्रक्रिया राबवावी, असे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक बॅंकांना त्यांच्या जिल्ह्यातील शाखा, विस्तार लक्षात घेऊनच पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे.
त्यामुळे शेतकर्यांचे पीक कर्जासाठी आलेल्या अर्जावर तात्काळ कार्यवाही करुन त्यांना कर्ज उपलब्ध करुन द्या. सध्या शेतकर्यांना शेतीसाठी पीक कर्जाची गरज असते. पुन्हा खरीप हंगाम संपल्यावर कर्ज मिळून उपयोग नसतो.
त्यामुळे बॅंकांनी त्याची नोंद घेऊन कार्यवाही करणे अपेक्षित आहे. पीककर्ज वितरणात काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर बॅंकांनी त्या तात्काळ सोडवाव्यात. त्यासाठी शेतकर्यांच्या पीक कर्ज वितरणावर परिणाम होता कामा नये, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले.*
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम