…जेव्हा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक उतरतात रस्त्यावर

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :-  वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आणि तिसरी लाटेचा धोका ओळखून शहरात निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी आता जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व पोलिस अधीक्षक मनोज पाटील स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. शहरात तपासणी करुन प्रशासनाकडून सक्त कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी भोसले यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी भोसले व पोलिस अधीक्षक पाटील यांनी शहरातील चितळे रोडसह कापड बाजार व इतर परिसरांमध्ये पाहणी केली. वैद्यकीय सेवा देणार्‍या आस्थापनांचीही त्यांनी जाणीवपूर्वक पाहणी करुन वैद्यकीय सेवेव्यतिरिक्त इतर वस्तूंची विक्री होतेय का, याचीही तपासणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी भोसले म्हणाले की, यापुढे लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होणार आहे. पार्सल सुविधा उपलब्ध असलेल्या हॉटेल्सवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच तिसरी लाट सुरू झाली आहे. रुग्णसंख्या हळू हळू वाढत आता बाराशेपर्यंत गेली आहे.p

नागरिकांनी आता स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. मास्क, सॅनिटायझर वापरुन सोशल डिस्टन्सचे पालन करावे. नगर शहरात कापड बाजार परिसरात मोठी गर्दी होते.

परंतु, कोरोनाच्या नियमांचे पालन व्हावे, यासाठी महापालिकेचे कर्मचारी खबरदारी घेत आहेत. नागरिकांनीच सतर्क होऊन स्वत:ची व समाजाची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी भोसले यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe