अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- राहुरी फॅक्टरी परिसरात ६ महिन्यांची बिबट मादी मृत अवस्थेत आढळून आली आहे. गुरुवारी दुपारी ही घटना उघडकीस आली.
राहुरी तालुक्यात दि. १ जानेवारी ते १२ ऑगस्ट या कालावधीत बिबट्याच्या मृत्यूची ही सहावी घटना घडली आहे. या घटनेची खबर स्थानिक शेतकऱ्यांनी वनविभागाला दिल्याने वनपाल सचिन गायकवाड, वनरक्षक पवन निकम, वनमजूर गोरख मोरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
शव विच्छेदनानंतर शुक्रवारी बिबट्याच्या या मादीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दि. १ जानेवारी ते १२ ऑगस्ट या कालावधीत ब्राम्हणी, चिंचविहीरे, वांबोरी, गोटुंबा आखाडा या परिसरात प्रत्येकी एक, तर देवळाली प्रवरा परिसरात दोन बिबटे मृत अवस्थेत आढळून आले आहेत.
तसेच यापाठोपाठ गुरुवारी राहुरी फॅक्टरी परिसरात ६ महिन्याची बिबट मादी मृत अवस्थेत आढळून आली. या मादीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे शव विच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे.
उसाचे मुबलक क्षेत्र तसेच पाणी व भक्ष्याची सोय उपलब्ध असल्याने राहुरी तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठी आहे. जानेवारी ते दि. १२ ऑगस्ट या कालावधीत कोंढवड, बारागाव नांदूर, देवळाली प्रवरा, चेडगाव या गावातील शेतकऱ्यांच्या मागणीनंतर वनविभागाने पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात बिबटे जेरबंद झाले आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम