कर्जत तालुका बनतोय अवैध धंद्यांचा हॉटस्पॉट ; प्रशासनाचे दुर्लक्ष

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- कर्जत तालुका अनलॉकमध्ये गुन्हेगारीसोबतच अवैध धंद्याचे हॉटस्पॉट म्हणून उदयास येत आहे. कारण मागील काही दिवसापासून अवैध धंद्याला ऊत आला असून, कोरोना पाठोपाठ आता कर्जत तालुक्यात अवैध धंद्याचा संसर्ग वाढला असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गावठी दारू तयार करण्याचे अड्डे राजरोसपणे सुरू आहेत. दररोज हजारो लिटर दारूची निर्मिती या भट्ट्यामधून होते. दिवसा तसेच रात्रीच्या वेळी दारू काढण्याचे काम चालते. या अवैध धंद्याच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होते.

शासकीय यंत्रणांची मात्र याकडे डोळेझाक होताना दिसत आहे. राशीन , मिरजगाव, कुळधरण यासह तालुक्याच्या अनेक भागात हे अवैध धंदे जोमात सुरू आहेत. सुरुवातीला गावठी दारू तयार करून आपल्या गावात विकण्याचे उद्योग काहींनी सुरू केले.

पुढे लाखो रुपयांची कमाई करत मजूर ठेवून हा धंदा मोठा केल्याचे दिसते. यातून दारूचे अड्डे चालवणारे बरेच अवैध चालक कर्जत तालुक्यात तयार झालेले आहेत. या वाढलेल्या अवैध धंद्यांच्या पैशातूनच शहरात हाणामारीचे प्रकार वाढले आहेत. या सर्व प्रकारांकडे पोलीस दुर्लक्ष करत आहेत.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे, दहशत, वाळू तस्करीअसे प्रकार सुरू आहे. पोलीस आंधळ्य़ाची भूमिका घेत असल्याने या परिसरात खुलेआम अवैध धंदे सुरू आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News