अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात कार्यान्वित झाल्यानंतर करण्यात आलेल्या पहिल्या चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले असून पहिल्या तुकडीतील एकूण १८८ नमुन्यांमध्ये १२८ रुग्ण हे ‘डेल्टा’ प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
डेल्टा प्रकारातील कोरोना विषाणूची वेगाने होणारी लागण लक्षात घेता, कोविड-१९ विषाणू प्रतिबंधक निर्देशांचे कठोर पालन प्रत्येकाने करण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन पालिकेने केले आहे. पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात विषाणुंचे जनुकीय सूत्र निर्धारण वैद्यकीय प्रयोगशाळा (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब) स्थापन करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ४ ऑगस्ट रोजी त्याचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर ही यंत्रणा वैद्यकीय दृष्ट्या प्रमाणित होवून कार्यान्वित करण्यात आली. विषाणूंचे जनुकीय सूत्र निर्धारण केल्याने, एकाच विषाणूच्या दोन किंवा अधिक प्रजातींमधील नेमका फरक ओळखता येतो.
असा फरक ओळखू आल्यानंतर उपचार पद्धतीची नेमकी दिशा स्पष्ट होते. कस्तुरबा रुग्णालयातील जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये एकाचवेळी सुमारे ३८४ वैद्यकीय नमुन्यांची तपासणी होऊन ४ दिवसांच्या आत वैद्यकीय निष्कर्ष प्राप्त होऊ शकतात.
या नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये पहिल्याच चाचणी तुकडीचा (फर्स्ट बॅच) भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण १९२ रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १२८ रुग्ण हे ‘डेल्टा’ प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उर्वरित नमुन्यांमध्ये अल्फा प्रकाराचे २, केपा प्रकाराचे २४ तर इतर रुग्ण हे सर्वसाधारण कोविड विषाणूने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम