अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- महात्मा गांधी, नेहरू आणि गांधी परिवाराची बदनामी केल्याप्रकरणी अभिनेत्री पायल रोहतगी हिच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
यावरून पायल रोहतगी व व्हिडिओ तयार करणाऱ्या अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी व त्यांचे कुटंबीय, काँग्रेस परिवार यांच्याविषयी खोटा व बदनामीकारक व्हिडिओ तयार करून तो सोशल मिडियावर पायल रोहतगी हिने प्रसारित केला.

त्यातून हिंदू -मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबतचा व्हिडिओ तिवारी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी व्हॉट्सऍपवर पाठवला होता. त्यानंतर याबाबत दखल घेत संगीता तिवारी यांनी अगोदर ही तक्रार सायबर पोलिसांकडे दिली होती.
सायबर पोलिसांनी ती शिवाजीनगर पोलिसांकडे वर्ग केली आहे. पायलचा चर्चेत राहण्यासाठी खटाटोप : पायल रोहतगी नेहमीच वादग्रस्त पोस्ट करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. तिने दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी आणि अनुराग कश्यप यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता.
यापूर्वी ट्विटरने खोट्या व बदनामीकारक पोस्ट टाकल्याने पायल हिचे अकाऊंट अनेक वेळा बंद केले आहे. हैदराबाद येथील सामुहिक बलात्कार प्रकरणात सांप्रदायिक ट्विट केल्याने तिच्यावर एक आठवड्याची बंदी घालण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅन्डलने रोहतगी ला २०१९ मध्ये ब्लॉक देखील केले होते.
जून २०१९ मध्ये पायल रोहतगी हिने शिवाजी महाराज यांच्याविषयी बदनामीकारक टिप्पणी केली होती. त्याविरुद्ध राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार करुन तिच्या अटकेची मागणी केली होती. त्यानंतर तिने माफी मागणारा व्हिडिओ प्रसारित केला होता.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम