एटीएम फोडण्याचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला

Ahmednagarlive24
Published:

राहुरी : शहरातील  नगर-मनमाड मार्गावरील राहुरीच्या बसस्थानकासमोरील काॅम्प्ल्केसमधील स्टेट बँक शाखेचे एटीएम फोडण्याचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला.

पोलिस आल्याचा सुगावा लागताच टोळीतील ५ चोरांनी घटनास्थळावरून धूम ठोकली. पळून जाणाऱ्यांपैकी एक जण पोलिसांच्या हाती लागला.

रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास बसस्थानकासमोरील गाळ्यात असलेले एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली. पाच चोरांच्या टोळीने एटीएम केबीनमध्ये प्रवेश करून लोखंडी हत्याराचा वापर करून यंत्र फोडण्याचा प्रयत्न सुरू केला.

त्याच वेळेस पोलिस निरीक्षक मुकूंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यमार्गावर गस्त घालणाऱ्या पोलिसांची नजर एटीएमकडे गेली. संशयितांच्या हालचाली लक्षात घेऊन पोलिसांनी एटीएम सेंटरकडे धाव घेतली.

पोलिसांना पाहताच चोरांनी पळ काढला. दत्तात्रेय लक्ष्मण बोऱ्हाडे (शिलेगाव, तालुका राहुरी) हा पळताना पाय घसरून गटारीत पडल्याने पोलिसांच्या हाती लागला.

बोऱ्हाडे यांच्याकडून एटीएम फोडण्यासाठी वापरली जाणारी एक लोखंडी कटावणी, दोन स्क्रू ड्रायव्हर,लोखंडी टाॅमी ही हत्यारे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. बसस्थानकासमोर असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएमसेंटरवर कुठलीही सुरक्षा नसल्याने ही घटना घडली आहे.

गजबजलेल्या ठिकाणी एटीएमफोडण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेची खबर परिसरात पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती.

घटनेची खबर मिळताच पोलिस उपअधीक्षक राहुल मदने, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, उपनिरीक्षक सचिन बागुल, उपनिरीक्षक गणेश शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

या घटने प्रकरणी काॅन्स्टेबल श्रीकृष्ण केकाण यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार झालेल्यांचा शोध पोलिस घेत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment