अहमदनगर – महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झालेल्या 30 वर्षीय महिलेचा प्रसुतीनंतर मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रुग्णालयात असलेल्या अपुर्या सुविधांमुळे या महिलेला आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. या संदर्भात महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. सतिश राजूरकर म्हणाले सदर प्रकाराबाबत चौकशी करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, नगरच्या बोल्हेगाव भागात राहणारी 30 वर्षीय महिलेला प्रसुतीसाठी देशपांडे रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर सिझरची शस्त्रक्रिया झाली. तिच्या पाटी नवजात बालकाने जन्म घेतला. बाळाची प्रकृती चांगली होती.
मात्र शस्त्रक्रियेनंतर सदर महिलेची प्रकृती खालावली. तिला रक्तही उपलब्ध करुन देण्यात आले परंतु थोड्या वेळाने तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. देशपांडे रुग्णालयात ऑक्सिजनची सुविधा होती मात्र आयसीयु सुविधा उपलब्ध नसल्याने तिला जिल्हा रुग्णालयात हलविण्यास रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
त्या महिलेच्या नातेवाईकांनी तिला विखे पाटील हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र तेथे पोहोचण्यास विलंब झालेला होता. कुटुंबियांनी सदर महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झालेला होता. देशपांडे रुग्णालयात असलेल्या अपुर्या सुविधांमुळे या महिलेला आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोपी कुटुंबियांनी केला आहे.