अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शेवगाव: देश महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना समाजात महिला सुरक्षित नाहीत, स्त्रीमुक्तीचा जागर झाला असला तरी समाजाची महिला भगिनींकडे बघण्याची मानसिक्ता आणि दृष्टिकोन बदलल्याशिवाय महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना थांबणार नाहीत, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
शेवगावच्या राजीव राजळे प्रतिष्ठानच्या वतीने विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल आ. राजळे यांची पेढेतुला व परिसरातील आदर्श महिला सन्मान सोहळ्यात आ. राजळे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य रमेश भारदे होते .
शेवगाव – पाथर्डी तालुक्यातील जनतेने विधानसभेच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा संधी दिल्याने आपली जबाबदारी वाढली असून, मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्नपूर्वक काम करण्याचा आपला प्रयत्न राहणार असून, त्यासाठी जनतेने साथ व सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.
आ.राजळे पुढे म्हणाल्या, ग्रामीण भागात विविध क्षेत्रांत उत्तुंग भरारी घेणाऱ्या या कर्तृत्ववान महिला समाजाचे भूषण असून, त्यांच्या या कार्यापासून इतर महिलांनी प्रेरणा घ्यावी. सत्तेवर असताना भाजप सरकारच्या काळात मतदारसंघासाठी मोठा विकास निधी आणून सर्वात जास्त विकासकामे करण्याचा प्रयत्न केला.
राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून अडचणीतील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करावी, यासाठी सोमवारपासून सुरू होणाऱ्या नागपूर अधिवेशनात भाजपच्या माध्यमातून आवाज उठवण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी या वेळी सूचित केले.