अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव : मतदारसंघातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, वाढत्या लोकसंख्येच्या आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक सुविधा मिळत नाही. जिल्हा रुग्णालय हे कोपरगाव विधानसभा मतदारसंघापासून जवळपास १०० किलोमीटर दूर आहे.
त्यामुळे रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा व येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे अर्थ व आरोग्यमंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे केली आहे. सोमवारपासून (दि. १६) नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झाले.
अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आ. काळे यांनी ना. पाटील यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. निवेदनात त्यांनी म्हटले की, कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील कोपरगाव शहरात असलेले ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय कमी पडत असून, शहरातील ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिल्यास ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय १०० बेडचे होईल. नागरिकांना चांगल्या प्रकारे आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहे.
उपजिल्हा रुग्णालय झाल्यास तज्ज्ञ डॉक्टर्स या ठिकाणी कायमस्वरुपी उपलब्ध राहतील. उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभाग असल्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना पुढील उपचारासाठी इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही. सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांना एकाच छताखाली मिळण्यास मदत होईल.
त्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय श्रेणी देण्यात यावी तसेच कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून नगर-मनमाड राज्यमार्ग व नागपूर-घोटी मार्ग जात असून, या मार्गावर नेहमीच अपघात होत असतात.
अपघातातील जखमींना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. अनेक नागरिकांना मोठ्या आजारावरील उपचारासाठी नाशिक, मुंबई आदी ठिकाणी खासगी दवाखान्यात जावे लागते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात खर्च येतो.
सर्वसामान्य नागरिकांना असे उपचार घेणे शक्य नाही. त्यासाठी कोपरगावमध्ये लवकरात लवकर ट्रॉमा केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी आ. काळे यांनी केली आहे.