अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला न्यायालयातून लवकर जामीन मिळण्यासाठी मदत करण्याकरिता, गुन्ह्याच्या तपासात आरोपीस मदत करण्यासाठी ५० हजारांची लाच घेताना पारनेर पोलिस ठाण्यातील शिपाई रामचंद्र पांडुरंग वैद्य (वय २८) याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने गुरुवारी रंगेहात पकडले.
तक्रारदाराचा पळशी येथील भाचा बाल लैंगिक अत्याचार व बलात्काराच्या गुन्ह्यात अटक आहे. तपासी अधिकाऱ्याचा रायटर व मदतनिस म्हणून काम करणाऱ्या वैद्य याने तक्रारदाराकडे आरोपीस लवकर जामीन होण्यासाठी व तपासात आरोपीच्या बाजूने मदत करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी केली होती.
तडजोड करण्याची विनंती करूनही वैद्य आपल्या मागणीवर ठाम होता. सुरूवातीला ३० हजारांचा पहिला हप्ता देण्याचे ठरल्यानंतर पोलिस ठाण्यासमोरील हॉटेलमध्ये भेट घेण्याचे निश्चित करण्यात आले. तक्रारदाराने नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क करून वैद्यच्याविरोधात तक्रार केली होती.
त्यानुसार पोलिस निरीक्षक दीपक कारंडे, पर्यवेक्षण उपअधीक्षक हरिष खेडकर यांनी पारनेर येथे येऊन सापळा रचला. हॉटेलमध्ये वैद्य याने तक्रारदाराकडून ५० हजारांची लाच घेताच त्याच्या हातामधील रक्कम हस्तगत करून त्यास अटक करण्यात आली.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com