Ahmednagar News : शिर्डीला देश-विदेशातून साईबाबांच्या दर्शनासाठी भक्त हजेरी लावून विविध प्रकारचे दान करत असतात. साईबाबांचे मंदिर हे सर्वधर्मिय देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.
याठिकाणी अनेक भक्त आपल्या यथाशक्ती दान देत असतात नुकतेच एका भाविकाने साडेचार किलो सोने दान केले होते. मात्र पुणे जिल्ह्यातील एका भक्ताने चक्क पाच टन केशर आंबे श्री साईबाबाचरणी दान केले आहेत.
आतापर्यंत पंढरपूरच्या विठुरायाला एका भक्तांकडून सात हजार किलो हापूस आंब्याचे दान दिल्याचे बघितले होते; परंतु शिर्डी येथील साईबाबांनादेखील मागील दोन वर्षांपासून केशर आंब्याचे दान येऊ लागले आहे.
यंदा पुणे जिल्ह्यातील शिरुर येथील शेतकरी साईभक्त दिपक नारायण करगळ यांनी सेंद्रीय पद्धतीने पिकविलेले ५ हजार किलो केशर आंबे देणगी स्वरुपात दिले असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
त्या म्हणाल्या साईभक्त दिपक करगळ यांची स्वत:ची मालकीची केशर आंब्यांची आमराई असून सदरचे केशर आंबे हे रासायनिक प्रक्रिया न करता पिकविलेले आहे. हे आंबे नैसर्गिकरित्या पिकविलेले व उच्च प्रतीचे आहेत.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून साईभक्त करगळ हे केशर आंबे संस्थानला देणगी स्वरुपात देत आहेत. यावर्षी सुमारे ४ लाख २५ हजार रुपये किंमतीचे ५ हजार किलो केशर आंबे देणगी दिलेले आहेत.