अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माझा बाप मुख्यमंत्री नव्हता, आमदार नव्हता, खासदारही नव्हता. मी सर्वसामान्यांतून आलो असतानाही सर्व पदे उपभोगली. त्यामुळे मला विखे कुटुंबीयांनी चॅलेंज करू नये. आमच्या पराभवासंदर्भात पक्षाने वरिष्ठ पातळीवर कमिटी नेमली आहे. ती अहवाल देणार आहे. त्यावेळी सर्व बाबी समोर येतीलच. आमच्यात कोणताही समेट झालेला नाही, असे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी रविवारी स्पष्ट केले.
संपर्क कार्यालयात नूतन जिल्हाध्यक्षांच्या सत्कारापूर्वी शिंदे पत्रकारांशी बोलत होते. नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, नगर शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्यासह तालुकाध्यक्ष व मंडलाध्यक्षांचा त्यांनी सत्कार केला. माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, उपाध्यक्ष युवराज पोटे, श्याम पिंपळे, सचिन पारखी, तुषार पोटे, रमेश पिंपळे, विवेक नाईक, उमेश साठे आदी या वेळी उपस्थित होते.
भाजप उमेदवारांच्या पराभवाला मी जबाबदार असल्याचे एक तरी उदाहरण सांगा, असे आव्हान खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिले होते. त्यावर बोलताना शिंदे यांनी ही टिपण्णी केली. कर्जत-जामखेडचा विकास झालाच नाही, हे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. मी केवळ पुस्तकात नाही, तर प्रत्यक्षात विकास करून दाखवला.
विरोधकांनाही बरोबर घेतलं. मतदारसंघात विरोधक शिल्लक राहिला नाही, म्हणूनच पवार यांनी माझा मतदारसंघ निवडला. निदान आता, तरी जनतेला दिलेली आश्वासने त्यांनी पूर्ण करून दाखवावीत, असा टोला शिंदे यांनी त्यांना लगावला.
मी मंत्री असताना मोठा निधी आणला.पन्नास वर्षांत जो विकास झाला नव्हता, तो मी करून दाखवला. ते त्यांना आता खपत नसेल. आम्ही विकास केला आहे. जसा पुस्तिकेत आहे, तसा प्रत्यक्षसुद्धा आहे, हे त्यांनी नीट पहावे. त्यांनी केलेल्या आरोपांत कोणतेही तथ्य नाही.
जिल्हा विभाजन झाले पाहिजे, यासाठी मी आग्रही आहे. आमच्या कार्यकाळात विभाजन होऊ शकले नाही. निवडणुकीच्या तोंडावर विभाजन झाले असते, तर वेगळा संदेश गेला असता. त्यामुळे तो विषय प्रलंबित राहिला. उत्तरेचे मुख्यालय कुठे करायचे, याबाबत सरकार निर्णय घेईल, असेही शिंदे म्हणाले.