अहमदनगर :- ऑनलाईन गेम पब्जीचे वाढते प्रमाण सर्वश्रुत आहे. या गेमची क्रेझ कोणत्याही वयोगटापर्यंत मर्यादित राहिलेली नाही, तर सर्वच वयोगटांपर्यंत या गेमचे चाहते झाले आहेत.
मात्र या गेमचे व्यसन सर्वाधिक तरुणाईत दिसून येत आहेत. हे व्यसन आजवर अनेकांच्या जीवावर देखील उठलेले आहे.
तर कधी स्वत:च्या आरोग्यासह नातेवाईक, आजूबाजूची मंडळी यांच्यासाठी त्रासदायक ठरत असल्याचे दिसून येत आहे.असाच अनुभव एका लग्नसोहळ्यात दिसून आला.
प्रसंग लग्न सोहळ्याचा, पाहुण्यांची मंगल कार्यालयात लगबग सुरू होती. वधू-वराचा एक एक विधी पार पडत होता.
वेळ आली ती वराच्या मिरवणुकीची. मंगल कार्यालयाच्या बाहेर वाद्यवृंदांनी ठेका धरला होता. वरदेखील मिरवणुकीसाठी सजवलेल्या अश्वावर स्वार झालेला होता.
परंतु इतर वेळी केवळ वाद्यांच्या पहिल्याच ठेक्यावर बेधुंदपणे ताल धरणारी मित्रमंडळी आज मात्र नाचताना दिसत नव्हती.
त्यामुळे मोठा प्रश्न पडला नेमके काय कारण असावे की, वाद्यांचा तालावर थिरकणारी तरूणाई आज शांत का.
वराने मित्रमंडळींना आमत्रंण दिले नाही का, त्यांचा यथोचित पाहूणचार केला नाही का, वरास मित्रमंडळीच नाहीत असे अनेक प्रश्न उपस्थित झाले.
मात्र मंगल कार्यालयात पाहिले असता अनेक तरूण टोळक्याटोळक्याने बसलेले दिसले.
कार्यालयात जाऊन हळूच त्या मुलांच्या गृपचे निरीक्षण केले असता, ते सर्वची सर्व मोबाईलवर व्यस्त असल्याचे दिसले.
त्यातील एकाला विचारले असता पब्जी गेम ऑनलाईन खेळत असल्याचे त्याने सांगितले. ते तरुण गेम खेळण्यात एवढे व्यस्त होते, की त्यांना कोणत्याही गोष्टीचे भान नव्हते.
या खेम खेळणाऱ्यांमध्ये १५ ते ३० वयोगटांचे तरुण असल्याचे पाहावयास मिळाले. तिकडे बाहेर वर मित्रमंडळी नाचायला येतील या आशेवर वाट पाहात घोड्यावर ताटकळत बसलेला होता.
कुणीतरी जाणकार व्यक्तीने मुलांच्या हातातील मोबाईल काढून घेत मंगलकायालर्याच्या बाहेर उसकवून दिले. त्यानंतर मिरवणुकीस सुरूवात झाली.
लग्नसमारंभ, यात्रोत्सव, विविध घरगुती कार्यक्रमांतून पाहुणे एकत्र येत एकमेकांची विचारपूस, खुशाली विचारत असत.
मात्र या मोबाईलच्या जमान्यात माणूस माणसापासून दूर चालला आहे.
माणसांमधील संवाद कमी झाल्याने त्यांच्यामध्ये एकलकोंडेपणा दिसत आहे. त्यामुळे त्यांच्यात चिडचिडेपणा, रागावणे यांचे प्रमाण वाढलेले आहे.
बाजारातही विविध कंपन्यांचे अगदी खिशाला परवडतील, अशा किमतीत मोबाईल मिळत आहेत. त्यामुळे घरात माणसे कमी आणि मोबाईलचे प्रमाणच वाढलेले दिसत आहे.