Petrol Price Today: दोन महिन्यांपासून भारतात पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Rates) स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत असताना भारतीय तेल कंपन्यांनी (Indian Oil Companies) 21 मे पासून पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या इंधनाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.
मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतीत घसरण होत असताना, सरकारने आज 20 जुलै 2022 रोजी पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्समध्ये (windfall tax) कपात केली आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे ONGC सारख्या सरकारी तेल कंपन्यांना फायदा होणार आहे, ज्यामध्ये पेट्रोलियम उत्पादनांची सर्वात मोठी भारतीय निर्यातदार रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरत राहिल्यास राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होऊ शकते.
इंडियन पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (Indian Oil Corporation) च्या ताज्या अपडेटनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज (बुधवार) पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 89.62 रुपये इतका स्थिर आहे.
त्याचवेळी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. राज्यस्तरीय करामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वेगवेगळ्या आहेत.
21 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 8 रुपयांनी आणि डिझेल 6 रुपयांनी कमी केल्यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून राष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थेच आहेत. आता कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे.
तुमच्या फोनवरून एसएमएसद्वारे तुम्ही दररोज भारतातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.