मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Ahmednagarlive24
Published:

मुंबई : वाहतूक कोंडीतून वेळ वाचल्यास प्रवास सुखकर होईल व निश्चित स्थळी वेळेत पोहोचता येईल.यासाठी  मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर देणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ना.म.जोशी मार्ग जंक्शनवरील डिलाईल पुलाच्या पोहोच रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, मुंबई महानगरपालिकेचे महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर सुहास वाडकर, आयुक्त प्रवीण परदेशी उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, वाहतूक व्यवस्था हे कुठलाही विकासाचे एक मानक आहे. मुंबईत जन्मलेला मी राज्याचा पहिला मुख्यमंत्री आहे. त्यामुळे मुंबईची वाहतूक व्यवस्था मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. मुंबईचा विस्तार सर्व बाजूंनी वाढत आहे . त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर विशेष लक्ष देण्यात येईल. त्यासाठी आवश्यक तो निधीही पुरविण्यात येईल.

डिलाईल रोड येथील रेल्वे पूल जीर्ण झाल्याने रेल्वे मार्फत निष्कासित करण्यात आला आहे. त्याठिकाणी 85 मीटर लांबीचा नवा पूल रेल्वे बांधणार आहे. त्यासाठी महापालिका रेल्वे प्राधिकरणास 125 कोटी रुपये देणार आहे. तर या पुलावर ना. म.जोशी मार्गावर दोन्ही बाजूने व गणपतराव कदम मार्गावर एका बाजूने असे मिळून 600 मीटर लांबीचे तीन पोहोच रस्ते महापालिका बांधणार आहे. पोहोच रस्त्यांसाठी सुमारे 95.50 कोटी रुपये खर्च येणार आहे. पावसाळा वगळून दीड वर्षात काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.असेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment