अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- देशाच्या संरक्षणासाठी के. के. रेंज प्रकल्प आवश्यक असला तरी याबाबत पुरेशी स्पष्टता नसल्याने परिसरातील शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रकल्पबाधित 23 गावांतील शेतकर्यांचा प्रपंच उघड्यावर पडू देणार नाही, त्यांचा प्रपंच हाच माझा प्रपंच आहे. आपण केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा करून गोंधळाचे वातावरण संपवून वस्तुस्थिती शेतकर्यांपर्यंत पोहोचवू, असे आश्वासन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले.
के. के. रेंज संदर्भातील संरक्षित क्षेत्राच्या अधिग्रहण संबंधात वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत असल्यामुळे परिसरातील शेतकर्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. त्यासंदर्भात घेतलेल्या राहुरी, पारनेर आणि नगर तालुक्यांतील 23 गावांतील प्रकल्पबाधित शेतकर्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
या गावातील सुमारे 40 हजार हेक्टरचे भूसंपादन के. के. रेंजसाठी करण्यात आले आहे. 1980 पासून वाढीव 25 हजार हेक्टरचे नोटिफिकेशन संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. हे क्षेत्र 2005 साली रेडझोन म्हणून डिमार्केशन करण्यात आले आहे. मात्र असे असूनही 1980 पासून ते 2019 पर्यंत आजतागायत एकदाही सुरक्षित क्षेत्राचा वापर केला गेला नाही.
जर तीस वर्षांपासून या क्षेत्राचा उपयोग झालेला नसेल तर या क्षेत्राचे कायमस्वरूपी संपादनाबाबत अट्टाहास का? त्यात रेड झोनमध्ये टाकल्यामुळे परिसरातील विकास खुंटला असल्याचे प्रकल्पबाधित शेतकर्यांनी निदर्शनास आणून दिले. खा. विखे यांनी प्रकल्पबाधित शेतकर्यांच्या भावना समजून घेऊन कागदपत्रांचा अभ्यास करण्यास सांगितले.
लोकसभा अधिवेशनासाठी हा प्रश्न पाठवला असून अर्थसंकल्पामुळे या अधिवेशनात संधी मिळाली नाही तर मार्चमध्ये हा प्रश्न लोकसभेत मांडू. त्याचबरोबर लष्कराच्या संबंधित सर्व विभागांमध्ये समक्ष भेटून, रक्षा मंत्री व लष्करप्रमुखांचे याकडे लक्ष वेधून पाठपुरावा करू असे सांगत शेतकर्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com