पारनेर: तालुक्यातील आदर्श गावाकडे वाटचाल करत असलेल्या भाळवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पश्चिम दिशेकडील इमारतीची भिंत काल दुपारी तीनच्या सुमारास कोसळली.
सुदैवाने रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे विद्यार्थी शाळेत नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून या शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीबाबत तसेच नवीन खोल्यांच्या मागणीचे प्रस्ताव वेळोवेळी प्रशासनाकडे दाखल करुनही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे, तसेच पदाधिकाऱ्यांकडेही अनेक वेळा यासंदर्भात मागणी करुनही या शाळेच्या खोल्यांसंदर्भात कोणतीही कार्यवाही अद्यापपर्यंत झालेली नाही.
या इमारतीच्या इतर भागालाही मोठमोठे तडे गेले आहेत. त्यामुळे भीतीच्या सावटाखाली शिक्षक व विद्यार्थ्यांना वर्गात बसावे लागत आहे. आजच्या या घटनेमुळे पालकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सुमारे 80 वर्षांपूर्वीची ही इमारत असून, या शाळेच्या आठही खोल्या नव्याने बांधण्याची गरज आहे.
गेल्याच आठवड्यात आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत भाळवणी येथे झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. यावेळी पवार यांनी या इमारतीची पाहणीही केली होती.
यासंदर्भात या इमारतीचे ऑडिट पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले होते. ही इमारत धोकादायक असल्याचे निर्लेखनही करण्यात आले होते. परंतु प्रशासनाने यासंदर्भात कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नसल्याने ही दुर्घटना घडली आहे. त्यामुळे पालकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.