सांगली : जगभरात सध्या व्हॅलेंटाईन डे आठवड्याचा उत्सव सुरु आहे. तरुणाईमध्ये या आठवड्याला विशेष महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी देखील आपल्या प्रेम कहाणीबाबत दिलखुलासपणे भाष्य केलं आहे.
प्रेम आयुष्यात मी एकदाच केलं अशी थेट कबुली रोहित पवार यांनी दिली. ते सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे के. बी. पी. कॉलेजच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलत होते.
तरुणांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले, “मी मुंबईमध्ये होतो. या सर्व प्रवासात काही प्रमाणात कष्टावर प्रेम होतं. त्यावेळी जीम करायचो. जीमवर प्रेम होतं. तुम्ही सर्वजण ज्या प्रकारच्या प्रेमाचा विचार करतात, तसं प्रेम आयुष्यात मी एकदाच केलं. ते प्रेम माझ्या बायकोवर केलं. हेच प्रेम शेवटपर्यंत राहणार आहे.”
“प्रेमाच्या गोष्टी आल्या की शिष्ट्या वाढतात. हे भारी आहे. कॉलेजचं जीवन खूप भारी असतं. मलाही कॉलेजचं जीवन आवडायचं. तेव्हा टेंशन अजिबात नव्हतं. घरुन दोन हजार रुपये महिन्याला यायचे. त्यातच कसातरी महिना निघायचा. कधी पैसे कमी पडले, तर मित्र असायचेच”, असंही रोहित पवार यांनी यावेळी नमूद केलं.