Farmer Success Story : जय जवान जय किसान असं आपण मोठ्या अभिमानाने म्हणत असतो. सीमेवरती देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांचा आणि सीमेच्या आत काळ्या आईची सेवा करून आपले उदर भरणाऱ्या बळीराजाचा जयघोष हा झालाच पाहिजे. दरम्यान आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील एका जवानाची शेतीमधील वाखण्याजोगी कामगिरी जाणून घेणार आहोत. अहमदनगर जिल्ह्यातील निंबोडी येथील एका जवानाने देशसेवा बजावल्यानंतर शेती मध्ये देखील अभूतपूर्व कामगिरी केली आहे.
मौजे निंबोळी येथील जवान गणेश भापसे यांनी 2011 पर्यंत सीमेवरती देशाची सेवा केली आहे. विशेष म्हणजे त्यांचे संपूर्ण कुटुंब समर्पणभावाने देशसेवा बजावत आहे. गणेश यांचे वडील मराठवाड्यातील संभाजीनगर येथील पैठण मध्ये काही वर्षे सुरक्षारक्षक म्हणून तैनात होते. तसेच त्यांचे बंधू दादासाहेब हेदेखील सैन्य दलात असून देशाची सेवा बजावत आहेत. गणेश भापसे 2011 पर्यंत सैन्यात सेवा देत होते.
मात्र तदनंतर गणेश यांना आपल्या पारिवारिक कारणामुळे आणि शेतीच्या जबाबदारीमुळे आपल्या घरी परतावे लागले. मात्र त्यांचे बंधू दादासाहेब अजूनहीं बडोद्यामध्ये सैन्य दलात कार्यरत आहेत. दरम्यान, सैन्य दलात काही काळ देशाची सेवा बजावल्यानंतर गणेश सध्या शेती व्यवसायात संपूर्ण समर्पण भावाने कार्यरत आहेत. विशेष म्हणजे शेती व दुग्ध व्यवसायात गणेश यांनी चांगली कामगिरी करून दाखवली आहे.
यामुळे सध्या गणेश यांची पंचक्रोशीत नव्हे-नव्हे तर संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. गणेश यांना दुग्ध व्यवसायात आणि शेती व्यवसायात त्यांच्या कुटुंबाची मोलाची साथ लाभत आहे. त्यामुळे गणेश व्यवसायात दिन दो्गुनी रात चौगुनी प्रगती साधत आहेत.
मित्रांनो 2002 हा काळ महाराष्ट्रासाठी विशेष कष्टाचा काळ राहिला आहे. या साली राज्यात भीषण दुष्काळ आला होता. याची झळ अहमदनगर जिल्ह्याला देखील बसली. मात्र, या दुष्काळी परिस्थितीचा काही सकारात्मक परिणाम देखील पाहायला मिळाला. या दुष्काळात देखील संधीचं सोनं करत भापसे परिवाराने दुग्ध व्यवसाय सुरू केला. दरम्यान या काळात शासनाकडून जनावरांसाठी छावणी सुरू करण्यात आली. दुग्ध व्यवसायात नव्याने उतरलेल्या भापसे कुटुंबाला याचा मोठा फायदा झाला.
त्यांनी त्यावेळी एचएफ जातीची गाय खरेदी केली. दरम्यान, या काळात गणेश यांच्या कुटुंबाला मामाकडून एक मदत मिळाली, ती म्हणजे मामांनी त्यांना तीन कालवडी भेट म्हणून दिल्या. इथूनच खरी यशाला सुरुवात झाली. दुष्काळामध्ये सुरू झालेला हा दुग्ध व्यवसाय 2011 पर्यंत गणेश यांच्या वडिलांनी मोठ्या हिमतीने पेलला. नंतर सैन्य दलात सेवा बजावून गणेश घरी परतल्यानंतर दुग्ध व्यवसाय सांभाळू लागले. गणेश यांनी दुग्ध व्यवसायाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली तोवर भापसे कुटुंबाकडे एकूण आठ गाई झाल्या.
दरम्यान पुन्हा दुष्काळ पडला, पुन्हा राज्य शासनाने छावण्या सुरू केल्या आणि भापसे कुटुंबाने पुन्हा तीन गाई विकत घेतल्या. म्हणजे दुष्काळातून भापसे कुटुंब आर्थिक प्रगतीचा नवीन मार्ग शोधत होता आणि दुष्काळाची झळ सोसून नवीन यशोगाथा लिहीत होता. दरम्यान नानाविध संकटांचा सामना करत गणेश आणि कुटुंबियांनी दुग्ध व्यवसायात नवीन यशोगाथा लिहीत आजच्या घडीला 20 गाई दहा मोठ्या कालवडी सहा वासरे असा दुग्ध व्यवसायाचा विस्तार केला आहे.
भापसे कुटुंब सकाळी चार वाजेपासून कामाला लागतात. सकाळी उठल्यानंतर प्रत्येक गाईला 25 ते 30 किलो चाऱ्याची व्यवस्था केली जाते. प्रत्येक गाईला रोज बारा किलो मुरघास, चार किलो भुसा, दहा किलो गवत व अन्य हिरवा चारा दिला जातो. दरम्यान सकाळी दूध काढल्यानंतर गाईना पिण्यासाठी स्वच्छ पाणी दिले जाते गोठ्याची साफसफाई केली जाते सायंकाळी पुन्हा हीच क्रिया होते.
दरम्यान गणेश यांनी दिलेल्या माहितीनुसार ते 14 वर्षांपासून मिल्किंग मशीनचा वापर करून दूध काढत आहेत. निश्चितच गणेश यांनी दुग्ध व्यवसायात आधुनिकतेची कास धरली आहे. दरम्यान, गणेश शेती व्यवसायात सक्रिय असून शेण आणि गोमूतत्राचा शेतीत खत म्हणून वापर केला जात आहे. सध्या गणेश 170 लिटर दूध संकलन करत आहेत. तसेच प्रभात डेअरीच्या दूध संकलनाची जबाबदारी गणेश यांच्याकडे आहे. गणेश यांनी संकलित केलेल्या दुधाला प्रतिलिटर 37 रुपये असा दर मिळत आहे. यामुळे त्यांना आर्थिक फायदा होत आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की गेल्या सहा वर्षांपासून गणेश मुरघास तयार करत आहेत. यासाठी त्यांनी दोन हौदाची निर्मिती केली आहे. याशिवाय गाईंना हिरवा चारा उपलब्ध व्हावा या अनुषंगाने हायड्रोपोनिक पद्धतीने 2019 पर्यंत त्यांनी हिरवा चारा उत्पादित केला. मात्र मक्याचे दर वाढल्यानंतर 2019 पासून त्यांनी मका लागवड सुरू केली. 2018 मध्ये देखील अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळाची झळ पाहायला मिळाली. मात्र मुरघास निर्मिती केली जात असल्याने गणेश यांना आपल्या गाई छावणी मध्ये पाठवण्याची गरज भासली नाही.
दरम्यान दुग्ध व्यवसायातून प्रगती साधत असताना गणेश यांनी शेतीमध्ये देखील मोठी प्रगती केली आहे. दुग्ध व्यवसायाच्या मदतीने त्यांनी बारा एकर शेत जमीन विकत घेतली आहे. त्यांच्याकडे वडिलोपार्जित तीन एकर शेत जमीन होती. दुग्ध व्यवसाय व्यतिरिक्त त्यांनी डाळिंब लागवडीचा प्रयोग केला आहे. आपल्या साडेतीन एकर शेत जमिनीवर त्यांनी डाळिंबाची लागवड केली आहे. दीड एकर क्षेत्रावर गाईसाठी हिरवा चारा लागवड करण्यात आला आहे.
पशुपालन व्यवसायातून गणेश यांना शेणखत मोठ्या प्रमाणात मिळते, याचा वापर ते शेतीमध्ये करतात. सध्या ते पंधरा ते वीस टक्के एवढ्याच रासायनिक खतांचा वापर करत असून उर्वरित सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. सेंद्रिय खतांचा वापर वाढला असल्याने रोगराईचे संकट कमी झाला आहे. डाळिंबावरील तेल्या रोग सेंद्रिय खतांमुळे कमी झाला आहे. गणेश यांच्याकडे सध्या 15 एकर शेत जमीन आहे. या एवढ्या क्षेत्रासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी या अनुषंगाने तीन विहिरी देखील खोदल्या गेल्या आहेत.
दरम्यान, दुष्काळाची झळ यांना सोसावे लागत असल्याने त्यांनी शेततलावाची निर्मिती केली आहे. यामुळे दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील त्यांना डाळिंब फळबागेतून चांगले उत्पन्न काढता येत आहे. निश्चितच गणेश यांनी दुग्ध व्यवसायात साधलेली ही प्रगती इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक आहे. गणेश यांनी सैन्यात सेवा बजावून आता स्वतःला शेतीसाठी समर्पित केले आहे. यामुळे निश्चितच इतर शेतकऱ्यांना गणेश त्यांच्याकडून प्रेरणा मिळणार आहे.
प्रयोगशील शेतकरी आणि दुग्धव्यवसायक माजी जवान गणेश भापसे संपर्क :- ८४५९४८०६६२, ९६५७६१६००३