Pomegranate Farming : गेल्या दोन दशकांपासून शेतकरी बांधवांनी उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने फळबाग वर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात शेती सुरू केली आहे. यामध्ये डाळिंब या पिकाची आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती सुरू झाली. मात्र आता जवळपास तीन ते चार वर्षांपासून सातत्याने डाळिंबाची लागवड कमी होत चालली आहे.
डाळिंब बागांवर तेल्या किंवा तेलकट रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असल्याने डाळिंब बागा क्षतीग्रस्त झाल्या असून वर्षानुवर्ष बाजारपेठेत डाळिंबाची आवक कमी होऊ लागली आहे. खरं पाहता, महाराष्ट्रात नासिक पुणे सोलापूर सांगली अहमदनगर सातारा यासह महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते.
मात्र आता पुण्यासह राज्यातील प्रमुख डाळींब उत्पादक जिल्ह्यातून डाळिंबाच्या बागा मोठ्या प्रमाणात काढून टाकल्या जात आहेत. यामुळे पुणे मार्केट यार्डमध्ये गेल्या काही वर्षांत डाळिंब आवक घटली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की कोरोनापूर्व पुणे मार्केट यार्ड मध्ये 40 ते 50 टन दिवसाला आवक होत होती.
विशेष म्हणजे हंगामात ही आवक 100 ते 150 टन रोजाना नमूद केली जायाची. मात्र कोरोना नंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली असून तेल्या रोगामुळे डाळिंबाची झालेली क्षती यासाठी कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. याशिवाय शेतकरी बांधव आता बांधावर येणाऱ्यां व्यापाऱ्यांनाच डाळिंब विक्री करण्यास प्राधान्य देत आहेत.
अशा परिस्थितीत सद्यस्थितीला मार्केट यार्डमध्ये 25 ते 30 टन रोजाना आवक होत आहे. निश्चितच बाजारपेठेत आवक कमी होत असल्याने दरात वाढ झाली आहे. यामुळे मात्र शेतकऱ्यांना फायदा होत नाहीये. तेल्या रोगामुळे शेतकरी बांधवांना आपल्या डाळींबाच्या बागा काढाव्या लागल्या असल्याने त्यांना आधीच लाखों रुपयांचा फटका बसला असून ज्या शेतकऱ्यांकडे थोड्याफार प्रमाणात डाळिंबाच्या बागा राहिल्या आहेत त्यांना देखील कुठं ना कुठे तेल्या रोग, मर रोग, पिन होल बोरर यांसारख्या कीटक आणि रोगांमुळे मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. उत्पादनात घट झाली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
यामुळे जरी डाळिंबाला अधिक दर मिळत असला तरी देखील प्रत्यक्षात याचा शेतकऱ्यांना फायदा होत नाहीये. मात्र सर्वसामान्य ग्राहकांना अधिक दरात डाळिंब खरेदी करावा लागत आहे. एकंदरीत पुणे मार्केट यार्डमध्ये गेल्या काही वर्षांपासून डाळिंब आवक घटली आहे. या मार्केट यार्डमधून जम्मू, दिल्ली, कर्नाटक, कोलकत्ता, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ यांसारख्या परराज्यात आणि महाराष्ट्रात देखील सर्वत्र डाळिंब विक्रीसाठी पाठवला जातो.
तेल्या रोगाची लक्षणे बरं नेमकी कोणती
डाळिंब पिकासाठी महाभयंकर असा तेल्या रोग डाळिंब पिकाच्या पानावर, फुलांवर, कळ्यांवर, फळांवर आढळतो. जाणकार लोक सांगतात की या रोगाची सुरुवात पानांपासून होते. मग फुले, कळ्या आणि फळे यावर या रोगाची लागण होत असते. पानावर लहान आकाराचे लंब गोलाकार ते आकारहीन असे तेलकट डाग येतात.
यामुळे याला तेल्या रोग म्हणतात. तेल्या रोगासाठी जर पोषक हवामान राहिलं तर हे डाग एकत्र येतात आणि रोगाची व्याप्ती वाढते. नंतर मग हे ठिपके काळवंडतात. या ठिपक्यांच्या कडेला पिवळसर असं वलय निर्माण होतं. हळूहळू रोगग्रस्त पाने गळू लागतात. याचप्रमाणे फुलकळींवर फुलांवर फळांवर या रोगाचा प्रसार होत असतो.
याच लक्षणाच्या आधारे या रोगाची ओळख पटवणे सोपे जाते. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, तूर्तास तरी या रोगावर कोणतच असं रामबाण औषध बाजारात उपलब्ध नाही. यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव डाळिंबवर आढळल्यास शेतकऱ्यांना मोठ नुकसान सहन कराव लागत.
काय म्हणताय व्यापारी?
डाळिंब व्यापाऱ्यांच्या मते, गेल्या काही वर्षांपासून डाळिंब भागांवर तेल्या रोगाचे सावट पाहता आवक घटली असून बाजारभावात वाढ झाली आहे. सद्यस्थितीला बाजारात भगवा जातीच्या डाळिंबाला साठ रुपये प्रति किलो ते अडीचशे रुपये प्रति किलो पर्यंतचा दर मिळत आहे. तसेच आरकता जातीचा डाळिंब 20 ते 80 रुपये प्रति किलो या दरम्यान विक्री होत आहे. याशिवाय गणेश जातीचा डाळिंब दहा ते पन्नास रुपये प्रति किलो यादरम्यान विकला जात आहे.
तसेच, अहमदनगर आणि पाथर्डी परिसरातील डाळिंब हंगाम संपला असल्याने बाजारात मोठी आवक कमी झाली असून सध्या दहा ते पंधरा टन एवढीच आवक बाजारात होत असल्याचे पुणे मार्केट यार्डतील एका व्यापाऱ्याने सांगितले. दरम्यान काही व्यापाऱ्यानी मार्च, एप्रिल मध्ये डाळिंब आवक वाढणार असल्याचे सांगितले आहे. खरं पाहता गेली दोन ते तीन वर्ष पावसामुळे डाळिंब उत्पादनावर मोठा विपरीत परिणाम होत आहे.