Onion Crop : कांद्याची लागवड ही एकूण तीन हंगामात केली जाते. खरीप रांगडा आणि रब्बी म्हणजे उन्हाळी अशा पद्धतीने कांदा लावला जातो. सद्य स्थितीला राज्यात रब्बी कांदा लागवड केली जात आहे. खरं पाहता रब्बी कांदा लागवड ही नोव्हेंबर डिसेंबर महिन्यातच उरकली जाते मात्र यावर्षी अनेक शेतकरी बांधवांची कांदा लागवड खोळंबली आहे.
बाजारात कांद्याला कमी दर मिळत असतानाही राज्यातील बहुतांश ठिकाणी अजूनही मोठ्या प्रमाणात रब्बी कांदा लागवड सुरू आहे. दरम्यान कांदा पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि विक्रमी उत्पादनासाठी योग्य प्रमाणात खताचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.
अशा परिस्थितीत आज आपण कांदा पिकासाठी कशा पद्धतीने खत व्यवस्थापन केले पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत. कृषी तज्ञांच्या मते, कांदा लागवड केल्यानंतर दोन महिन्यांपर्यंत नत्राची गरज असते. 2 महिने झाले की म्हणजे कांदा पोसला गेला की मग नत्राची आवश्यकता नसते.
स्फुरद हे कांदा पिकाच्या मुळांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. यामुळे कांद्याची लागवड करण्याअगोदर जमिनीमध्ये तीन ते चार इंच खोलीवर स्फुरदचा पुरवठा केला पाहिजे. यामुळे कांद्याची वाढ झपाट्याने होते. याशिवाय पालाश हा घटक देखील पीक वाढीसाठी अति महत्त्वाचा असून याचा देखील पूर्ण डोस लागवड करण्याआधी दिला पाहिजे.
कृषी तज्ञ सांगतात की, 60 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश आणि 20 किलो ग्रॅम गंधकयुक्त खते कांद्याला दिली गेली पाहिजे. मात्र लागवडीच्या वेळी नत्राची संपूर्ण मात्रा पिकाला दिली गेली नाही पाहिजे. 1/3 भाग एवढेचं शिफारशीत नत्र लागवडीवेळी पिकाला द्यावे उर्वरित नत्र दोन हप्त्यांमध्ये विभागून दिले पाहिजे. मात्र स्फुरद आणि पालाश व गंधक लागवडीच्या वेळी पूर्ण लावले पाहिजे.
आता नत्राचा दुसरा आणि तिसरा हप्ता केव्हा दिला पाहिजे तर लागवडीनंतर तीस दिवसांनी दुसरा हप्ता नत्राचा दिला पाहिजे. तसेच लागवडीनंतर 45 ते 50 दिवसांनी नत्राचा तिसरा हप्ता दिला पाहिजे.
मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की, नत्राची मात्रा दोन महिन्यानंतर चुकूनही देऊ नये. नाहीतर यामुळे जोड कांदे, डेंगळे कांदे येणे तसेच कांद्याचे साठवणूक क्षमता कमी होऊ शकते.
तसेच कृषी तज्ञ सांगतात की, कांदा पुनर्लागवडीनंतर दोन महिने झाले की, 30 ग्रॅम 00:52.34 प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली पाहिजे. याशिवाय कांद्याची साठवणूक क्षमता सुधारण्यासाठी पिकाची काढणी करण्याच्या अगोदर दहा ते पंधरा दिवस 0.1 टक्का बाविस्टीनची फवारणी केली पाहिजे.
मात्र शेतकरी बांधवांनी कोणत्याही खताचा पिकाला वापर करण्यापूर्वी तसेच फवारणी करणे अगोदर तज्ञ लोकांचा सल्ला घेणे अपरिहार्य राहणार आहे.