कोपरगाव :- शहरात सॅनिटायझर वाटप करण्याचे नाटकी थोतांड करून नगर पालिकेला बदनाम करू नका, तुम्ही कोरोनाच्या परिस्थितीत नगर पालिकेला एक रुपयांची देखील मदत केलेली नाही.
शहरात औषध फवारणी केली त्याबद्दल तुमचे आभार, खालच्या पातळीचे राजकारण करू नका, अशी टीका नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी कोल्हे यांच्यावर केली.
शुक्रवार नगर परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वहाडणे म्हणाले, नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष योगेश बागुल व कोल्हे गटाचे गटनेते रवींद्र पाठक यांनी कोपरगाव नगरपरिषदेवर आरोप करत कोल्हे कारखाना पालिकेस अल्पदरात सॅनिटायझर देत असताना पालिकेने त्यास प्रतिसाद न दिल्याचा आरोप केला.
कोल्हे गटाच्या नेत्यांनीच आपण तालुक्यात नागरिकांना मोफत सॅनिटायझरच्या बाटल्या देणार असल्याचे सांगितले. त्यांनीच १५ एप्रिल रोजी पालिकेने या बाटल्या २० रुपये किमतीस खरेदी कराव्या, असे पत्र दिले होते.
त्यावर उपनगराध्यक्ष योगेश बागुल व गटनेते रवींद्र पाठक यांच्या सह्या आहेत. शहर व तालुक्यात मोफत वाटण्याचे जे काम चालू आहे, ते एक उत्तम प्रकारे वठवलेले नाटक आहे.
एका ग्रामपंचायतीस हेच सॅनिटायझर थेट विक्री केल्याची पावतीच वहाडणे यांनी पत्रकार परिषदेत दाखवली. तालुक्यात कोल्हे यांनी जाहीर केल्याप्रमाणे ४५ हजार कुटुंबे दाखवले.
मात्र तालुक्यात ६९ हजार २०८ कुटुंबे असल्याचे वहाडणे यांनी सांगितले. याउलट आमदार आशुतोष काळे यांनी नगरपरिषदेस पत्र देऊन आपण कोपरगाव शहरातील नागरिकांना मोफत सॅनिटायझर वाटप करणार असल्याचे कळवले.