अहमदनगरच्या सेवानिवृत्त जवानाचा शेतीत अभिनव उपक्रम; एका एकराच्या संत्रा बागेतून मिळवले 15 लाखांचे उत्पन्न, संपूर्ण जिल्ह्यात रंगली चर्चा

Published on -

Ahmednagar News : अलीकडे शेतीमध्ये शेतकऱ्यांना नानाविध अशा अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे शेतकरी बांधव शेती नको रे बाबा असा ओरड करत आहेत. विशेष म्हणजे नवयुवक शेतकरी पुत्र देखील आता शेतीपासून दुरावत आहेत. निश्चितच पारंपारिक पद्धतीने शेती करत असल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.

शेतकरी बांधवांनी शेती व्यवसायात थोडासा बदल करून आधुनिक पद्धतीने शेती केली तर निश्चितच त्यांना चांगली कमाई होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून आधुनिक पद्धतीने शेती कसूनही नैसर्गिक आपत्तीमुळे, बाजारात शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे,, शासनाच्या कुचकामी धोरणामुळे कुठे ना कुठे शेतकऱ्यांची पिळवणूकच होत आहे.

पण या अशा परिस्थितीवर मात करत अहमदनगर मधील एका सेवानिवृत्त जवानाने शेतीमध्ये लाखो रुपयांच उत्पन्न कमावले आहे. जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मौजे धामणगाव देवीचे येथील शिवाजीराव गंगाधर काकडे यांनी भारतीय सैन्यत देशसेवा बजावल्यानंतर शेती करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर त्यांनी 2018 मध्ये संत्रा लागवड केली. एक एकर शेत जमिनीत संत्रा लागवड करत या बागेची जोपासना त्यांनी सेंद्रिय पद्धतीने केली.

साहजिकच लष्करात सेवा बजावल्यामुळे शिस्त अंगात भिनलेली आणि याच शिस्तीच्या आणि अंगात रुजलेल्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी अवघ्या चार वर्षात या एक एकर संत्रा बागेतून 15 लाखांची कमाई केली आहे. तांबूस मुरमाड जमिनीत त्यांनी या संत्रा फळ पिकाची लागवड केली. माती पिकासाठी अनुकूल असल्याने चांगला बहार आला. शिवाजीराव यांनी सांगितल्याप्रमाणे मे महिन्यात त्यांनी संत्रा बागेचा पहिला बहार धरला.

यानंतर फुलधारणा झाली, चांगली फळधारणा झाली आणि फेब्रुवारी महिन्यात यापासून त्यांना उत्पादन देखील मिळू लागले. सेंद्रिय खतांचा वापर झाल्याने फळे निरोगी होती आणि आकर्षक फळांना पाहून व्यापाऱ्याने चक्क 15 लाख रुपयांना जागेवरच मालाची खरेदी केली. शिवाजीराव सांगतात की त्यांनी बागेसाठी शेणखत आणि गोमूत्र चा मोठ्या प्रमाणात वापर केला. यामुळे बाग निरोगी राहण्यास मदत झाली. या बागेत संपूर्ण बहार कालावधीमध्ये केवळ पाच ते सहा फवारण्या त्यांनी केल्या आहेत. विशेष म्हणजे संत्रा बागेतून उत्पादन मिळण्याआधी त्यांनी या बागेत आंतरपीक म्हणून भुईमूग कांदा उडीद मूग यासारखे पिकांची देखील शेती करून चांगले उत्पन्न घेतले आहे.

तनियंत्रणासाठी त्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने आंतरमशागत केली असून संपूर्ण मशागतीच्या कामात त्यांच्या आई-वडिलांनी तसेच त्यांची अर्धांगिनी स्वाती यांनी त्यांना मोलाची साथ दिली आहे. निश्चितच शिवाजीराव यांनी सेवानिवृत्तीनंतर शेतीमध्ये केलेली ही कामगिरी चांगल्या-चांगल्या प्रयोगशील शेतकऱ्यांना देखील लाजवणारी आहे.

अनेकदा नवयुवक शेतकरी पुत्रांकडून कमी शेत जमीन आहे म्हणून भागत नाही, संसाराचा गाडाच चालू शकत नाही, कमी जमिनीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही अशी ओरड पाहायला मिळते. मात्र शिवाजीराव यांनी अवघ्या एका एकरात 15 लाखांची कमाई काढत या अशा लोकांना आरसा दाखवण्याचे काम केला आहे. निश्चितच शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल केला आणि त्याला जर बाजाराची साथ लाभली, बाजारात शेतमालाला योग्य दर मिळाला तर निश्चितच शेतीतून लाखो रुपयांची कमाई हमखास होऊ शकते हेच सेवानिवृत्त जवान शिवाजीराव यांनी दाखवून दिले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe