Weather Update : महाराष्ट्रात चार मार्चपासून ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाने थैमान माजवलं होत. चार मार्च ते आठ मार्च दरम्यान अहमदनगर पुणे छत्रपती संभाजीनगर धुळे, नासिक यांसह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची हजेरी पाहायला मिळाली. उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात तर गारपीट झाली. यामुळे रब्बी हंगामातील काढणीसाठी आलेल्या आणि फळबाग पिकांना मोठा फटका बसला.
खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे आणि रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिक भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांच कधीही भरून न निघणारे नुकसान झालं आहे. अशातच पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
यामुळे या अवकाळी पावसापासून बचावलेलं पीक पुन्हा एकदा संकटाच्या भोवऱ्यात सापडणार असल्याचे चित्र आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये नुकताच पाऊस झाला आहे. राज्यातील नंदूरबार, नाशिक, पालधर, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, पुणे, जालना, अहमदनगर या जिल्ह्यात अवकाळी पावसाची तीव्रता अधिक पाहायला मिळाली आहे.
यातून बळीराजा सावरत नाही तोवर आणखी एकदा पाऊस होणार आहे. राज्यात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या पाच दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. 30 ते 40 किमी वेगाने वाऱ्यांचा वेग राहणार असून विजांचा कडकडाटांसह अवकाळी पाऊस पडणार आहे.
निश्चितच वादळी वाऱ्यासह कोसळणारा हा पाऊस रब्बी हंगामातील पिकांसाठी घातक राहणार असून थोड्याफार प्रमाणात बचावलेली पिक देखील यामुळे भूसपाट होऊ शकतात अशी भीती आता व्यक्त होत आहे. आधीच बाजारात सोयाबीन, कापूस, कांदा यांसारख्या मुख्य पिकांना कवडीमोल दर मिळत असल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसत आहे. एकंदरीत सुलतानी आणि आसमानी संकटांमुळे बळीराजा पुरता भरडला जात आहे.